Wednesday, May 29, 2024

राजेंद्रसिंह यादव यांच्या आंदोलनाला यश ; मुख्याधिकाऱ्यांची तातडीने कारवाई ; भ्रष्टाचाराविरोधात लढा चालूच ठेवणार ; राजेंद्रसिह यादव ;


वेध माझा ऑनलाईन।
कराड येथील नगरपालिकेतील नगररचना विभागातील पाच अधिकाऱयांकडून मोठा भ्रष्टाचार होत असून नागरिकांना त्रास दिला जात आहे. त्यामुळे त्यांच्या बदल्या करण्यात याव्यात, या मागणीसाठी नगरपालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा यशवंत विकास आघाडोचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी दिला होता. या आंदोलनाची दखल घेत मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी नगररचना विभागातील दोघांना कार्यमुक्त (बडतर्फ) केले. एकाची बदली केली. तर राजपत्रित दोन अधिकाऱयांबाबत तक्रारोचे निवेदन साहाय्यक संचालक नगररचना सातारा यांना पाठवले आहे. हे दोन्ही अधिकारी वैद्यकीय रजेवर गेले आहेत.

बुधवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा अन्यथा पालिकेला टाळे ठोकून या अधिकाऱ्यांची गाढवावरून धिंड काढणार असल्याचा इशारा यादव यांनी दिला होता. दुपारी यादव हे समर्थकांसह पालिकेत दाखल झाले. गाढवही आणण्यात आले होते. त्यामुळे पालिकेत खळबळ उडाली होती. पोलीसही दाखल झाले होते. राजेंद्रसिंह यादव, हणमंत पवार, किरण पाटील, सुधीर एकांडे, गजेंद्र कांबळे, ढेकळे, विनोद भोसले यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी यादव यांना चर्चेसाठी बोलावल्याने सर्वजण मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात गेले.मुख्याधिकारी खंदारे यांनी यादव यांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे आपल्या अधिकारात असणारी कारवाई केली आहे असे सांगितले. कारवाईची माहिती दिली. त्यानंतर राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकारांना याबाबतची माहिती दिली.  
स्वानंद शिरगुप्पे व श्री पवार यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार मुख्याधिकाऱयांकडे नाहीत. त्यांयाबाबत तक्रारोंचे निवेदन नगररचना सातारा विभागाकडे पुढील कारवाईसाठी त्यांनी पाठवले आहे.  प्रधानमंत्री शहरी आवास योजनेंतर्गत तात्पुरती नियुक्ती असणारे रणजित वाडकर व शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ निलेश तडाखे यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश मुख्याधिकाऱयांनी दिले. दोन्ही अधिकाऱ्यांना कामकाजाबाबत तोंडी सुचना दिल्या होत्या. तरीही आपल्या वर्तनात बदल झाला नाही. आपणाबाबत यशवंत विकास आघाडीने तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे दोघांनाही तात्पुरत्या सेवा कामातून कार्यमुक्त करण्यात येत आहे, असे आदेश मुख्याधिकाऱयांनी बजावून ते पत्र यादव यांना दिले. तर नगरपालिका आस्थापनेवरील वामन संतोष शिंदे यांची बांधकाम विभागातून यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये बदली करण्यात आली. राजपत्रित दोन्ही अधिकारी अगोदरच वैद्यकीय रजेवर गेले आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी खंदारे यांनी दिल्याची माहिती यादव यांनी पत्रकारांना दिली. 
पालकमंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन दिले होते. त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱयांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या दोन राजपत्रित अधिकाऱ्यांची चौकशी होऊन 4 जूननंतर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. पालिकेतील अन्य विभागांबाबतही तक्रार असून पालिकेची खातेनिहाय चौकशी व लेखापरीक्षण करण्याची मागणी पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे केली आहे असेही त्यांनी सांगितले

लढा सुरूच राहिल...
आम्ही केलेल्या मागण्यांवर तातडीने कारवाई झाल्याने टाळे ठोकन्याबाबतचे आंदोलन स्थगित केले आहे. मात्र लढा थांबणार नाही. जोपर्यंत पालिकेला लागलेली भ्रष्टाचाराची किड थांबत नाही, तोपर्यंत लढा देत राहणार असल्याचा इशारा राजेंद्रसिंह यादव यांनी दिला.

मुख्याधिकाऱ्यांची आडगी भूमिका 
या सर्व विषयाबाबत पत्रकारांनी कराडचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना विचारले असता मला माध्यमांशी बोलायचे नाही माझ्या अधिकारात जेवढे आहे तेवढी कारवाई मी केली आहे असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले

No comments:

Post a Comment