Saturday, May 11, 2024

गोपीनाथ मुंडेंची आठवण काढत उदयनराजेंना अश्रू अनावर: पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी उदयनराजे बीडमध्ये : पंकजा मुंडेंना निवडून देण्याचे केले आवाहन ;

वेध माझा ऑनलाइन भाजपच्या बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा प्रचार करताना उदयनराजे भोसले चांगलेच भावूक झाले होते. गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढताना उदयनराजे यांना भरसभेत अश्रू अनावर झाले. उदयनराजेंनी आसवांना वाट मोकळी करून देतानाच हात जोडले. मतदारांना वाकून नमस्कार केला. उदयनराजे वाकून नमस्कार करत असताना पंकजा मुंडे त्यांना नको नको म्हणत होत्या. उदयनराजेंच्या या कृतीने अनेकांना गलबलून आलं. स्वत: पंकजा मुंडे यांनाही अश्रू अनावर झाले. त्यामुळे सभेला आलेले नागरिक काही काळ स्तब्ध झाले होते.

चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. त्यानिमित्ताने बीडमध्ये पंकजा मुंडे यांची मोठी सभा झाली. या सभेला स्वत: उदयनराजे भोसले आले होते. अजित पवार आले होते. अजित पवार यांच्या तडाखेबंद भाषणानंतर उदयनराजे यांनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी मिश्किल टिप्पणीही केली. अजितदादा आणि इतर वक्त्यांनी सर्व काही बोलून टाकलं आहे. विकास कामांची माहिती दिली आहे. माझ्यासाठी काहीच ठेवलं नाही. आता मी काय बोलू? असं उदयनराजे म्हणाले तेव्हा एकच खसखस पिकली.

कॉलेजमध्ये असताना… जेव्हा आपण एखादं लांबलाचक भाषण करतो तेव्हा पाहिल्याच टाळ्या आणि शिट्ट्या होतात. तुम्ही टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या ना समजायचं आपण उरकतं घेतलं पाहिजे, अशी मिश्कील टोलेबाजी उदयनराजे यांनी केली. माझं काळीज, माझे मित्र गोपीनाथ मुंडे यांना वंदन करतो. ( असं बोलताना त्यांचा कंठ दाटला) मघाशी अजितदादा बोलले. पंकजाताई बोलल्या. एक लक्षात घ्या, तुम्हाला माहीत नसेल तर ऐका. मुंडे कुटुंबाचं कुलदैवत शिखरशिंगणापूर. कामानिमित्त ते इथे आले. हे मला मुंडे साहेबांनी सांगितलं होतं. त्यावेळी कारखानदारी नव्हती. ऊसतोड कामगार होते. ते लढले आणि झटले. जगले. असं असताना आज त्यांच्या कन्येने तुमच्याकडे हात पसरून मतं मागायची?, असा सवाल उदयनराजे यांनी केला.
ते म्हणाले हृदयापासून सांगतो. बाय हार्ट… महिला वडीलधारी लोकं. एक लक्षात घ्या.  ती तुमची मुलगी आहे, बहीण आहे. तिला मतदान नाही करायचं तर कुणाला करायचं? कृपया माझ्या बहिणीला निवडून द्या, असं आवाहन करताना त्यांनी हात जोडले. त्यांचा कंठ दाटून आला होता. डोळ्यातून अश्रू येत होते. 
मुंडेंनी माझं बोट धरलं
माझे वडील वारल्यानंतर कोण नव्हतं बोट धरायला. गोपीनाथ मुंडे यांनी माझं बोट धरलं. (असं म्हणताना उदयनराजे अक्षरशः रडले) माझ्या गळ्याची शपथ आहे. तुम्हाला महाराजांची शपथ आहे. कुणी कायपण बोललं तर विश्वास ठेवू नका. पंकजा मुंडेना निवडून द्याअसे आवाहन त्यांनी यावेळी केले 

No comments:

Post a Comment