Thursday, May 16, 2024

शरद पवार म्हणाले... बारामतीचे मतदान झाल्यापासून अजित पवार आजारी आहेत, अशी माझी माहिती आहे ; काय आहे बातमी...?

वेध माझा ऑनलाइन।
बारामती मतदारसंघातील मतदान पार पडल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत कुठे, असा प्रश्न विचारला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात तसेच महायुतीच्या प्रचाराला त्यांची गैरहजेरी दिसत आहे. यावरून विविध वावड्या उठल्या असताना आता शरद पवारांनीही यावर भाष्य केले आहे. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली असता त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, बारामतीचे मतदान झाल्यापासून अजित पवार खरंच आजारी आहेत, अशी माझी माहिती आहे. त्यामुळे ते कुठे दिसत नसवाते.

पंतप्रधान मोदी यांच्या राज्यातील दौऱ्याच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस हे उपस्थित असतात. सुरुवातीच्या काही सभांना अजित पवार उपस्थित होते. पण बारामती मतदारसंघाच्या प्रचारात अजित पवार यांनी बारकाईने लक्ष घातले होते. त्यांनी बारामतीमध्येच ठाण मांडले होते. परिणामी उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार असतानाही अजित पवार उपस्थित नव्हते. राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल हे उपस्थित होते. बुधवारी दिंडोरीत झालेल्या सभेला राष्ट्रवादीच्या वतीने छगन भुजबळ तर कल्याणमध्ये सुनील तटकरे हे उपस्थित होते. पण अजितदादा कुठेच दिसले नाहीत. मुंबईतील रोडे शोच्या वेळीही अजित पवार उपस्थित नव्हते. तसेच पंतप्रधन मोदी यांनी मंगळवारी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी ‘रालोआ’च्या घटकपक्षाचे नेते उपस्थित होते. मात्र तिकडे अजित पवार फिरकले नाहीत.
बारामतीमधील मतदान पार पडताच अजित पवार यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या शरद पवारांबद्दल केलेल्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. ‘शरद पवार यांना आम्हाला संपवायचे आहे’ या पाटील यांच्या विधानावर पवार यांनी आक्षेप घेतला होता. तसेच या विधानामुळे नकारात्मक वातावरण निर्माण झाल्यानेच चंद्रकांत पाटील यांना बारामतीपासून दूर ठेवण्यात आले, असेही पवार म्हणाले होते. बारामतीवरून अजित पवार यांनी मतदान पार पडल्यावरच भाजपवर खापर फोडले होते. पुण्यातील भाजप नेत्यांनी अजितदादांच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment