महिला शिक्षण मंडळ संचलित कराड येथील महिला महाविद्यालयात सार्वजनिक चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली असून, गेल्या वर्षभरापासून या प्रयोगशाळेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जात आहेत. नागरिक, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक, शेतकरी तसेच संशोधक विद्यार्थ्यांना या सुविधेचा मोठा लाभ होत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत बल्लाळ यांनी दिली.
यावेळी प्रा. डॉ. शंकर हजारे, प्रा. डॉ. अखिलेश शिंदे आणि प्रा. डॉ. विलास सुर्वे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. बल्लाळ म्हणाले, महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पाण्याची शुद्धता तपासण्यापासून ते अन्नपदार्थ, दूध, माती आणि हवेच्या गुणवत्तेच्या परीक्षणापर्यंत विविध चाचण्या केल्या जातात. निवासी सोसायट्या, कार्यालये, शाळा-महाविद्यालये, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, विहिरी, नळ तसेच जलतरण तलावातील पाण्याचे नमुने तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे. पाण्याच्या गुणवत्तेबाबत खात्री करून घेण्यासाठी या चाचण्यांचा उपयोग होतो. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करताना ग्रेव्ही, तसेच जिवाणूंच्या चाचण्यांचा समावेश आहे. रोगकारक जंतूंची ओळख आणि आवश्यक सूक्ष्मजीवविषयक तपासण्यांसाठीही प्रयोगशाळेत सुविधा उपलब्ध आहेत. दुधातील एकूण चरबीचे प्रमाण, मॅस्टायटिस चाचणी, एनएमबीआरटी चाचणी आणि दुधातील भेसळ तपासणी अशा विविध चाचण्याही येथे केल्या जातात. त्यामुळे दूध आणि अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्यासाठी संबंधितांना स्थानिक पातळीवर सुविधा मिळत आहे.
महाविद्यालयात संशोधन करणार्या पीएचडी विद्यार्थ्यांसाठी यूव्ही स्पेक्ट्रोफोटोमीटरसारख्या उपकरणांवर आधारित चाचण्या उपलब्ध आहेत. तसेच मायक्रोबायोलॉजिकल टेस्टिंगसह विविध संशोधनात्मक चाचण्या करण्याची सुविधाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनासाठी आवश्यक असलेल्या चाचण्या स्थानिक पातळीवर करून घेणे शक्य होत आहे.सातारा जिल्ह्यात एवढ्या विविध प्रकारच्या चाचण्या एकाच ठिकाणी उपलब्ध होणे ही कराडसाठी अभिमानाची बाब असल्याचे डॉ. बल्लाळ यांनी नमूद केले. प्रयोगशाळेतील चाचण्या तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जात असल्याने परीक्षणाच्या गुणवत्तेला महत्त्व दिले जाते. ग्रामीण भागातून महाविद्यालयात शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थिनींना दर्जेदार शिक्षणासोबतच आधुनिक प्रयोगशाळेचा अनुभव मिळत आहे. सार्वजनिक चाचणी प्रयोगशाळेच्या माध्यमातून शैक्षणिक ज्ञान, संशोधन आणि समाजोपयोगी सेवा यांचा समन्वय साधण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment