Monday, November 16, 2026

राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांना शिवसेनेचे कराडचे शहराध्यक्ष राजेंद्र माने यांनी शब्दसुमनांनी दिल्या शुभेच्छा ; वाचा त्यांच्याच शब्दात ;

वेध माझा ऑनलाइन।
लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व. शिवाजीराज देसाई (आबासाहेब) यांचा वारसा जोपासत असलेले आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर यशस्वी झालेले पाटण विधानसभा मतदारसंघाचे उमदं नेतृत्व. फक्त वाड-वडिलांचा वारसा सांगून आपल्याला कर्तृत्व सिद्ध करता येत नाही, तर कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावाच लागतो व आपल्या कार्यकर्तृत्वाने जनतेला आपल्या नेतृत्वावर विश्वास निर्माण व्हावा लागतो, तरच जनतेच्या मनावर आपण अधिराज्य गाजवतो, हेच सूत्र अधोरेखित करणारे, आपल्या कार्यकर्तृत्वावर महाराष्ट्र राज्याच्या राजकीय क्षेत्रातील ऑलराऊंडर व्यक्तीमत्व असलेले महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री,सातारा जिल्हयाचे पालकमंत्री तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक ना. शंभूराज देसाईसाहेब यांचा दि. 17 नोव्हेंबर रोजी 60 वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने....

                     अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वयाच्या १९ व्या वर्षी राजकारणात प्रवेश करावा लागलेल्या ना. शंभूराज देसाई यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर पाटण विधानसभा मतदारसंघाबरोबर संपूर्ण राज्यात आपल्या समाजाभिमुख कार्याचा दबदबा निर्माण केला आहे.गेल्या ४० वर्षांपासून ना. शंभूराज देसाई यांनी सातत्याने संघर्ष केला आहे. कोणत्याही पराभवाने खचून न जाता त्यांनी संघर्ष कायम ठेवला व त्याचाच परिपाक म्हणून आज केवळ पाटण मतदारसंघात नाही तर जिल्हयामध्ये आणि राज्याच्या राजकारणामध्ये ना. शंभूराज देसाईसाहेब यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. कारण सामान्य जनतेमध्ये खऱ्या अर्थाने ना. शंभूराज देसाई यांच्यावर विश्वास निर्माण झाला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांची प्रशासनावर असलेली वचक, काम करुन घेण्याची हातोटी तसेच जनतेचे प्रश्न सोडविण्याची तळमळ यामुळे त्यांना 'लोकनेते' या नावाने ओळखले जात होते. आजही लोकप्रतिनिधी त्यांच्या कार्याचा उल्लेख करतात. हा खऱ्या अर्थाने पाटण तालुक्याचा गौरव असून लोकप्रतिनिधी असावा तर लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्यासारखा असावा, असे आदराने म्हंटले जाते. त्याच लोकनेते साहेबांचे नातू ना. शंभूराज देसाई यांनाही कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली तर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही मिळाल्याने पाटण विधानसभा मतदारसंघाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असून जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. ही बाब निश्चितच तालुक्यासाठी गौरवास्पद अशी आहे. सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर ना. शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन खात्याचा पदभार व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेली जबाबदारी तितकीच नेटाने सांभाळत  त्यांनी राज्याच्या पर्यटनाबरोबर पाटण तालुक्याच्या विकासाला नवी दिशा देण्याचे काम केले आहे. महाराष्ट्र राज्य आणि पर्यटन हे अतूट असून राज्याचा पर्यटन विकास व्हावा तसेच पर्यटनाला चालना मिळावी यासाठी पर्यटनमंत्री म्हणून ना. शंभूराज देसाई सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आहेत. सातारा जिल्ह्यातील पर्यटन वाढीवर त्यांचे विशेष लक्ष आहे. सामाजिक कार्याचा पिंड असणारे साहेब जरी राजकीय क्षेत्रात काम करत असले तरी समाजाच्या हितासाठी जे जे करावे लागते ते ते करण्याची कायम तयारी ठेवतात. प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द यामुळे समाजकारण करता करता त्यांनी राजकारणात यशाची उंच शिखरे पादाक्रांत केलेली असून साहेबांना अनेक मानाची, सन्मानाची पदे मिळाली परंतु साहेबांनी या सत्तेचा बडेजाव न करता याचा वापर सामान्य जनतेच्या कल्याणासाठी केलेला आहे.आमदार, मंत्री म्हणून मिळालेल्या सुवर्णसंधीचे तर साहेबांनी सोनं केले. मुत्सद्दीपणा व विद्वत्ता तसेच लोकसंग्राहक गुण व संघटन कौशल्य आत्मसात करुन राजकारणात, समाजकारणात आणि सहकारात साहेबांची चौफेर प्रगतीच आपल्याला पहायला मिळते. सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्यांनी राजकारण व समाजकारण केले व आजही करत आहेत. याच गुणांच्या जोरावर एक कृतीशील, संयमी, विचारी लोकमान्य नेते म्हणून साहेबांकडे लोक आदराने पाहतात. विकास हा होतच असतो, परंतु तो जलदगतीने घडला पाहिजे. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असावी लागते. सुदैवाने साहेबांना ती लाभली आहे. साहेबांनी आपले विचार नेहमी रोखठोकपणे मांडले. आपल्या निर्णयाची त्यांनी नेहमी सोदाहरणसह स्पष्टीकरणे दिली आहेत. त्यांची माणसाची पारख करण्याची क्षमता निसर्गदत्त असून येणाऱ्या प्रत्येकाची आदरभावाने चौकशी करून कामाचे स्वरूप जाणणारे साहेब म्हणूनच लोकाभिमुख नेता म्हणून पुढे आले. कारखाना कार्यस्थळ असो की अन्य ठिकाणे साहेब येणार असे समजताच तो परिसर माणसांनी फुलून गेलेला आपण पाहतो. एखाद्याच्या नावावरून माणसे ओळखण्यामध्ये लोकनेत्यांचा वारसा त्यांनी जपला आहे. अभ्यासवृत्ती, सावधानता कोणत्याही समस्येच्या मुळाशी भिडून निर्णय घेण्याची कार्यपद्धती, आवश्यक त्या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेणे हीच शिकवण देत साहेबांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात गरुडभरारी घेतली आहे.साहेबांच्या सातत्याच्या संघर्षामुळे स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे असलेले स्वप्न 42 वर्षांनंतर नुकतेच साहेब सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून निवडून आल्याने पूर्ण झाले. एक कुशल, अभ्यासू व आक्रमक व्यक्तिमत्त्व म्हणून संपूर्ण राज्यातील मान्यवरांच्या नजरेत साहेबांना कधीच हेरले असल्याने विधिमंडळाच्या अधिवशेन कालावधीमध्ये साहेबांकडे विविध खात्यांची जबाबदारी दिली जाते,ती लिलया पार पाडतात. कोणताही विभागा असो,कोणताही विषय असो त्याचे समर्पक उत्तर देऊन ते सदस्यांचे समाधान करतात त्यामुळे विरोधी पक्षातील विधानसभा सदस्यांकडून ना.शंभूराज देसाईसाहेब हे एक ऑलराऊंडर व्यक्तीमत्व असल्याचे उद्गार काढून साहेबांच्या कामाचे कौतुक झालेले आपण पाहिले आहे. त्यांचे विचार, बोलणं एकदम स्पष्ट. त्यातही भावनेनं ओथंबलेलं आवाहन करताना जनसमुदायाच्या हृदयाला हात घालण्याचं त्यांचं कसब तर अत्यंत लाजवाब आहे. उत्कृष्ट संभाषण कला हा त्यांचा सर्वश्रेष्ठ अलंकार असून त्यांचे वक्तृत्व माणसाच्या हृदयापर्यंत जाते आणि त्यांची जनहिताची तळमळ समोरच्या समुदायाला नक्की जाणवते. हे त्यांचं सर्वात मोठं कौशल्य असून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उंची देणारं त्यांचं अमोघ अस्त्रही आहे. लोकसंग्रह ही साहेबांची मोठी शक्ती. जनता दरबार असो की कोणताही कार्यक्रम या ठिकाणी साहेबांच्याबरोबर नेहमी जनतेची गर्दी पाहवयाला मिळते.सामान्य गोरगरीब जनतेसाठी योग्य निर्णय घेण्याची जाणीव त्यांना आहे. मोजके पण ठाम बोलणे सहकाऱ्यांना समजवून घेणे या गुणांमुळे ते लोकप्रिय आहेत. अशा या गौरवशाली, संवदेनशिल राज्याच्या राजकीय क्षेत्रातील ऑलराऊंडर नेतृत्व असलेले ना.शंभूराज देसाईसाहेब यांना वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मा श्री राजेंद्र माने 
(अध्यक्ष- कराड शहर, शिवसेना)

No comments:

Post a Comment