Tuesday, August 2, 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत जवळपास चर्चा पूर्ण ! ; भाजप कडे जाणार गृहखाते...60-40 असा फॉर्म्युला ठरला ;अनेक नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी...खात्रीलायक वृत्त...

वेध माझा ऑनलाइन - राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत जवळपास चर्चा पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत टप्प्याटप्प्याने काही माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे येत्या 5 ऑगस्टला हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हे निश्चित झाल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कुणाकडे कोणती खाती असणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, भाजपला गृह विभाग हवं आहे आणि ते खातं भाजपकडेच जाण्याची दाट शक्यता आहे.

राज्यात अडीच वर्षांपूर्वी युतीचं सरकार होतं. त्यावेळी गृह खातं हे भाजपकडेच होतं. विशेष म्हणजे ते खातं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याचकडे ठेवलं होतं. राज्यातील सुरक्षा यंत्रणेशी संबंधित हे खातं महत्त्वाचं आहे. त्यामुळे भाजपला हे खातं हवं आहे. भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिल्याने गृहखातं हे भाजपकडेच जाणार असल्याची माहिती मिळतं आहे.सुरुवातीला 15 ते 16 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजप गृह खातं स्वत:कडे ठेवणार आहे. 60-40 असा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला आहे. या विस्तारात शिवसेनेतील शिंदे गटाच्या अनेक माजी मंत्र्यांना वेट अॅड वॉचवर ठेवणार. मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. या शपथविधीला केंद्रातून भाजप नेते येण्याची शक्यता आहे.


एकनाथ शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांची गाडी फोडली ; मुख्यमंत्र्यांसोबत पुणे दौऱ्यावर असताना ही घटना घडली आहे....

वेध माझा ऑनलाइन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांसोबत पुणे दौऱ्यावर आहेत. या दरम्यान उदय सामंत यांच्या गाडीवर कात्रज चौकात शिवसैनिकांनी हल्ला केला. 

शिवसैनिकांनी गाडीच्या काचेवर जोरजोरात हात मारून काचा फोडल्या, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेचे थरारक व्हिडीओ देखील समोर आले आहेत. दरम्यान घटनेच्या वेळी परिसरात प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात पूरेपूर प्रयत्न केला.
उदय सामंत हे मोहमद वाडी येथील कार्यक्रम संपवून शिवसेना नेते तानाजी सावंत यांचे कात्रज येथील घराजवळ आले होते. यावेळी चौकाजवळ संबंधित घटना घडली. विशेष म्हणजे चौकाजवळच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आलेली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमलेले होते. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामागे उदय सामंत यांचा ताफा होता. कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांना गाडीत बघितलं त्यानंतर हल्लाबोल केला. सामंत यांच्या गाडीचे काच फुटल्याची माहिती मिळाली आहे.
या सगळ्या गदारोळादरम्यान पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली. कार्यकर्त्यांनी सामंतांच्या ताफ्यावर हल्ला चढविल्यानंतर पोलिसांनी मध्यस्ती केली. त्यांनी सामंत यांना सुरक्षितपणे पुढे मार्ग काढून दिला. पण यावेळी परिसरात प्रचंड मोठी गर्दी जमा झालेली होती. प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. 

आमदार,खासदार यांच्यासह आता क्रिकेटर देखील शिंदेंच्या भेटीला ; चर्चेला उधाण..

वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडलं. एकनाथ शिंदेंनी पहिले आमदार मग खासदार आणि त्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणावर आपल्या बाजूने वळवलं. शिंदेंकडे जवळपास रोजच शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी दाखल होत असतानाच दोन क्रिकेटपटूंनी घेतलेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव आणि सुरेश रैना यांनी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांचे पूत्र आणि लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे. रैना आणि केदार जाधव यांची ही भेट सदिच्छा भेट असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे

तू येतो का माझ्यासोबत, चला शिवसेना फोडुया, मला मुख्यमंत्री करा असे प्रकार या गद्दारांनी केला ; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर हल्लाबोल ; शंभूराज देसाईंनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं ; ठाकरेंचे पाटण तालुक्यामध्ये येऊन आ. देसाईंना आव्हान ;

वेध माझा ऑनलाइन - आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी (२ ऑगस्ट) शिवसंवाद यात्रा पाटणमध्ये पोहचल्यानंतर केलेल्या भाषणात शिवसेनेतील बंडखोरांवर जोरदार हल्ला चढवला. “मी आधी बोललो नव्हतो, पण आज मुलगा म्हणून बोलतो आहे. कारण, मुख्यमंत्र्यांचं कुटुंब खचून गेलं असतं, तर महाराष्ट्राचं काय होणार ही चिंता होती,” असं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं. तसेच गद्दारांनी उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना आमदारांची जमवाजमव करत बंडखोरी केल्याचा आरोप ठाकरेंनी केला.
दरम्यान,दुसरीकडे हे निर्लज्ज गद्दारांचे नेते ज्यांनी उद्धव ठाकरेंची काळजी घ्यायला हवी होती, विचारपूस करायला हवी होती, सांगायला हवं होतं की मी तुमच्यासोबत आहे त्यांनी हे काहीच केलं नाही. या गद्दारांनी उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना आमदारांची जमवाजमव सुरू केली. तू येतो का माझ्यासोबत, चला शिवसेना फोडुया, मला मुख्यमंत्री करा असे प्रकार या गद्दारांनी केलं,” अशी माहिती ठाकरेंनी दिली.
या भागाचे आमदार शंभूराज देसाई यांनी राजीनामा द्यावा व परत निवडून येऊन दाखवावं अस म्हणत तेदेखील गद्दार असल्याचे ठाकरे म्हणाले

आदित्य ठाकरे म्हणाले, “जेव्हा उद्धव ठाकरेंवर पहिली शस्त्रक्रिया झाली तेव्हा मी जागतिक पर्यावरण परिषदेत बाहेर होतो. मला माझ्या वडिलांचं, माझ्या पक्षप्रमुखांची शस्त्रक्रिया होणार आहे हे माहिती होतं. मी त्यांना विचारलं बाबा तुमची शस्त्रक्रिया आहे मी काय करू? ते म्हणाले तू जा, तू स्वतःसाठी नाही, तर महाराष्ट्रासाठी जात आहे. तू जायला पाहिजे.
“त्यांच्यावर एकाच आठवड्यात एक नाही तर दोन शस्त्रक्रिया झाल्या. ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असेल त्यांना माहिती आहे शस्त्रक्रिया होणाऱ्या ठिकाणी किती भीतीदायक वातावरण असतं. आपण दातांच्या डॉक्टरांकडे किंवा लस घ्यायला जातो तरी घाबरतो. मनात भीती असते. मात्र, उद्धव ठाकरेंवर एक नाही, तर दोन शस्त्रक्रिया झाल्या. त्यानंतर काय झालं हे मी आधी बोललो नाही, पण मुलगा म्हणून आता बोलतो आहे. 
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “मी उद्धव ठाकरेंच्या वेदना, दुःख बघत होतो. ते रुग्णालयातील बेडवरून हलू शकत नव्हते. हातापायांची जास्त हालचाल होत नव्हती. असं असतानाही कोणत्याही पक्षाच्या आमदार, मंत्र्याने, प्रशासकीय अधिकाऱ्याने फोन केला तर उद्धव ठाकरे बोलण्याचा प्रयत्न करत होते. व्हॉट्सअप केला तर बोलत होते. तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेत होते. महाराष्ट्रातील काम त्यांनी कोठेही थांबू दिलं नाही.”

 गद्दारानी उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना आमदारांची जमवाजमव केली”
हे गद्दार नेते ज्यांनी उद्धव ठाकरेंची काळजी घ्यायला हवी होती, विचारपूस करायला हवी होती, सांगायला हवं होतं की मी तुमच्यासोबत आहे त्यांनी हे काहीच केलं नाही. या गद्दारांनी उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना आमदारांची जमवाजमव सुरू केली. तू येतो का माझ्यासोबत, चला शिवसेना फोडुया, मला मुख्यमंत्री करा असे प्रकार या गद्दारांनी केलं,” अशी माहिती ठाकरेंनी दिली.आमदार शंभूराज देसाई यांनी राजीनामा द्यावा व परत निवडून येऊन दाखवावं असेही म्हणत तेदेखील गद्दार असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने केली अटक ; शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाहन चालकाने पेढे वाटून व्यक्त केला आनंद! ..

वेध माझा ऑनलाइन - शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आणि त्यानंतर न्यायालयाने त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. त्यानंतर मंगळवारी (२ ऑगस्ट) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाहन चालकाने दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला. प्रकाश राजपूत असं या वाहन चालकांचं नाव आहे. त्यांनी १९९३ ते २००० या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या गाडीवर चालक म्हणून काम केल्याचं सांगितलं. याबाबत झी २४ तासने वृत्त दिलं आहे.

प्रकाश राजपूत यांनी दिल्लीत जाऊन खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. तसेच श्रीकांत शिंदेंना पुष्पगुच्छ आणि पेढे दिले. यानंतर संजय राऊतांच्या अटकेवर बोलताना राजपुतांनी खूप आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. तसेच संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याचं काम केल्याचा आरोप करत आता राऊत २०२४ पर्यंत तुरुंगातून बाहेर निघायला नको, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे प्रकाश राजपूत म्हणाले, “संजय राऊत जेलमध्ये गेले त्याबद्दल मी खूप खुश आहे. त्या निमित्ताने मी खासदार श्रीकांत शिंदे यांना पेढे दिले आहेत. राऊतांनी चुकीची कामं केली आणि शिवसेना संपवली. आता २०२४ पर्यंत ते तुरुंगाबाहेर निघायला नको.”

“मी १९९३ ते २००० या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या गाडीवर चालक होतो,” असंही राजपूत यांनी नमूद केलं.


राज्यातील सरकार घटनाबाह्य ; अजितदादानी घेतली राज्यपालांची भेट; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक...

वेध माझा ऑनलाइन - ठाकरे सरकार जाऊन शिंदे सरकारला येऊन महिना उलटून गेला आहे. तरी देखील अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावर विरोधक सातत्याने टीका करत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील यावरुन शिंदे सरकावर हल्लाबोल केला होता. राज्यात अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. बाकी खात्याचेही अनेक प्रश्न प्रलंबित आहे. घटनेनुसार दोन मंत्र्यांचे सरकार बेकायदेशीर असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस जास्तच आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे एक शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेत निवेदन दिले.

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन महिना उलटून गेली तरीही राज्यात अजुनही मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. राज्यातील सरकार घटनाबाह्य आहे, अशी लक्षवेदना राज्यपालांकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हसन मुश्रीफांसह इतर नेते उपस्थित होते. यावर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे. यावेळी अजित पवार म्हणाले, की राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विदर्भ मराठवाडा मधील अतिवृष्टीमुळेहानी झाली आहे, त्यासाठी ताबडतोब मदत दिली पाहिजे. 1 महिन्यापेक्षा जास्त काळ झाला. परंतु, मंत्रीमंडळ विस्तार होत नाही. सीएम आणि डिसीएमची उद्या वेळ मागितली आहे. केंद्राची टीम पाठवून पाहणी करावी अशी मागणी केली.

फडणवीसांनी केली अजितदादांची परतफेड ; नेमका काय प्रकार झाला ?

वेध माझा ऑनलाइन -  सत्ता गेल्यानंतर सर्व अधिकार जातात तसेच शासकीय घर सुद्धा सोडावं लागत. पण महाराष्ट्राचे विरोध पक्षनेते अजित पवार यांना देवगिरी बंगला सोडायचा नव्हता. यासाठी अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना साकडं घातलं होतं. गेली अडीच वर्ष उपमुख्यमंत्री पदावर काम करत असताना अजित पवार यांना देवगिरी बंगला मिळाला होता. त्यामुळे अजित पवार यांना देवगिरी आपलासा वाटायला लागला. अजित पवार यांनी देवगिरी बंगला स्वतः कडे राहावा, यासाठी उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचीही चर्चा होती. अखेर अजित पवार यांची इच्छा सत्ताधाऱ्यांनी पूर्ण केली आहे.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मैत्री पुन्हा आली समोर...
मलबार हिल येथील देवगिरी बंगला विरोधी पक्षनेते अजित पवार यांना देण्यात येणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मैत्री पुन्हा एकदा समोर आली आहे. अजित पवार यांनी देवगिरी बंगला कायम राहवा यासाठी देवेंद्र फडणवीस यांना दोन वेळा पत्र लिहून विनंती केली होती. त्यानंतर आज राज्य सरकारने देवगिरी बंगला अजित पवार यांना मिळणार असल्याचं शासकिय परीपत्रक काढण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मैत्री सर्वश्रूत आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा महाराष्ट्राला आला आहे.
अजित पवार 1999 ला काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आलं तेव्हापासून देवगिरी बंगल्यावर राहायला गेले. 1999 ते 2014 अजित पवार देवगिरी बंगल्यावरच राहत होते. पण 2014 साली भाजपचं सरकार आल्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देवगिरी बंगला मिळाला. 2019 ला पुन्हा एकदा सत्तांतर झाल्यानंतर अजित पवार देवगिरी बंगल्यावर राहायला गेले.
देवेंद्र फडणवीस 2019 साली विरोधी पक्षनेता झाल्यानंतर त्यांना सागर बंगला देण्यात आला. हा बंगला आधी मंत्र्यांसाठी आरक्षित होता, पण फडणवीस यांनी सागर बंगल्याची मागणी केली. महाविकासआघाडी सरकारनेही कोणताही आक्षेप न घेता फडणवीसांना सागर बंगला दिला. आता अजित पवारांनी देवगिरी बंगल्यातच राहण्याचा आग्रह केला होता. त्यामुळे फडणवीसांनी मागची परतफेड केली असल्याचंही बोललं जात आहे.