Tuesday, August 2, 2022

एकनाथ शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांची गाडी फोडली ; मुख्यमंत्र्यांसोबत पुणे दौऱ्यावर असताना ही घटना घडली आहे....

वेध माझा ऑनलाइन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांसोबत पुणे दौऱ्यावर आहेत. या दरम्यान उदय सामंत यांच्या गाडीवर कात्रज चौकात शिवसैनिकांनी हल्ला केला. 

शिवसैनिकांनी गाडीच्या काचेवर जोरजोरात हात मारून काचा फोडल्या, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेचे थरारक व्हिडीओ देखील समोर आले आहेत. दरम्यान घटनेच्या वेळी परिसरात प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात पूरेपूर प्रयत्न केला.
उदय सामंत हे मोहमद वाडी येथील कार्यक्रम संपवून शिवसेना नेते तानाजी सावंत यांचे कात्रज येथील घराजवळ आले होते. यावेळी चौकाजवळ संबंधित घटना घडली. विशेष म्हणजे चौकाजवळच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आलेली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमलेले होते. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामागे उदय सामंत यांचा ताफा होता. कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांना गाडीत बघितलं त्यानंतर हल्लाबोल केला. सामंत यांच्या गाडीचे काच फुटल्याची माहिती मिळाली आहे.
या सगळ्या गदारोळादरम्यान पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली. कार्यकर्त्यांनी सामंतांच्या ताफ्यावर हल्ला चढविल्यानंतर पोलिसांनी मध्यस्ती केली. त्यांनी सामंत यांना सुरक्षितपणे पुढे मार्ग काढून दिला. पण यावेळी परिसरात प्रचंड मोठी गर्दी जमा झालेली होती. प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. 

No comments:

Post a Comment