वेध माझा ऑनलाइन - सत्ता गेल्यानंतर सर्व अधिकार जातात तसेच शासकीय घर सुद्धा सोडावं लागत. पण महाराष्ट्राचे विरोध पक्षनेते अजित पवार यांना देवगिरी बंगला सोडायचा नव्हता. यासाठी अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना साकडं घातलं होतं. गेली अडीच वर्ष उपमुख्यमंत्री पदावर काम करत असताना अजित पवार यांना देवगिरी बंगला मिळाला होता. त्यामुळे अजित पवार यांना देवगिरी आपलासा वाटायला लागला. अजित पवार यांनी देवगिरी बंगला स्वतः कडे राहावा, यासाठी उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचीही चर्चा होती. अखेर अजित पवार यांची इच्छा सत्ताधाऱ्यांनी पूर्ण केली आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मैत्री पुन्हा आली समोर...
मलबार हिल येथील देवगिरी बंगला विरोधी पक्षनेते अजित पवार यांना देण्यात येणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मैत्री पुन्हा एकदा समोर आली आहे. अजित पवार यांनी देवगिरी बंगला कायम राहवा यासाठी देवेंद्र फडणवीस यांना दोन वेळा पत्र लिहून विनंती केली होती. त्यानंतर आज राज्य सरकारने देवगिरी बंगला अजित पवार यांना मिळणार असल्याचं शासकिय परीपत्रक काढण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मैत्री सर्वश्रूत आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा महाराष्ट्राला आला आहे.
अजित पवार 1999 ला काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आलं तेव्हापासून देवगिरी बंगल्यावर राहायला गेले. 1999 ते 2014 अजित पवार देवगिरी बंगल्यावरच राहत होते. पण 2014 साली भाजपचं सरकार आल्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देवगिरी बंगला मिळाला. 2019 ला पुन्हा एकदा सत्तांतर झाल्यानंतर अजित पवार देवगिरी बंगल्यावर राहायला गेले.
देवेंद्र फडणवीस 2019 साली विरोधी पक्षनेता झाल्यानंतर त्यांना सागर बंगला देण्यात आला. हा बंगला आधी मंत्र्यांसाठी आरक्षित होता, पण फडणवीस यांनी सागर बंगल्याची मागणी केली. महाविकासआघाडी सरकारनेही कोणताही आक्षेप न घेता फडणवीसांना सागर बंगला दिला. आता अजित पवारांनी देवगिरी बंगल्यातच राहण्याचा आग्रह केला होता. त्यामुळे फडणवीसांनी मागची परतफेड केली असल्याचंही बोललं जात आहे.
No comments:
Post a Comment