Wednesday, August 2, 2023

दादागिरी खपवून घेतली जाणार नाही - आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा कराडातील खंडणी बहाद्दरांना दम... ; घाटावरील हातगाडा धारकांना दिला आधार ; म्हणाले...काही अडचण असेल तर मला डायरेक्ट फोन करा ;

वेध माझा ऑनलाईन । दोन दिवसापूर्वी कराड शहरातील प्रीतिसंगम बागेच्या भागातील खाद्य पदार्थांच्या हातगाडे धारकांना धमकावीत हफ्ता वसुलीसाठी दमदाटी करत असल्याची घटना घडली. याप्रकरणी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन घाटावरील हातगाडा धारकांशी संवाद साधत कोणीही कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करत असेल तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही असा सज्जड दम यावेळी आ. चव्हाण यांनी गुन्हेगारांना दिला. तसेच जे कोणी खंडणीखोर आहेत त्यांना तात्काळ अटक करावी व शहरातील कायदा सुव्यवस्था अजिबात बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ काळजी घ्यावी अशा सूचना देखील यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडचे डी वाय एस पी तसेच जिल्ह्याचे एस पी यांना केल्या. यावेळी कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवास थोरात, प्रशांत देशमुख, विनायक मोहिते, जयवर्धन देशमुख, विश्वजित दसवंत, अबरार मुजावर आदीसह घाटावरील बाधित हातगाडेवाले यावेळी उपस्थित होते. 

ज्या हातगाडीवालेना हफ्ता मागणाऱ्या गुंडाचा त्रास होतो अशा सर्वानी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर हात जोडून विनंती केली आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला न्याय द्यावा, ह्या गुंडगिरीतून आम्हाला आधार द्यावा. अशी गाऱ्हाणी आ. चव्हाण यांनी ऐकल्यानंतर बाधितांना विश्वास देत कोणीही गुंडगिरी करत असेल व कायदा सुव्यवस्था बिघडवत असेल तर खपवून घेतले जाणार नाही याबाबत पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे, घाटावर विशेष पथक नेमले जावे व तात्काळ योग्य ती कारवाई करावी अशा सूचना यावेळी आ. चव्हाण यांनी दिल्या. तसेच इथून पुढे अशा घटना घडल्या तर पोलिसांना तात्काळ संपर्क करा आणि तरीसुद्धा मार्ग निघत नसेल तर मला डायरेक्ट फोन करण्याचे आवाहन आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी करत घाटावरील हातगाडेधारकांना आधार दिला यामुळे हातगाडे धारकांनी समाधान व्यक्त करीत पृथ्वीराज बाबांनी गुन्हेगारांच्या बाबतीत घेतलेल्या कडक भूमिकेचे स्वागत करीत समाधान व्यक्त केले. 

पुराव्याच्या बाबतच्या "त्या' चर्चेत पृथ्वीराज चव्हाण फडणवीसांकडून "क्लिन बोल्ड' ;? "त्या'' चर्चेचा व्हीडिओ राज्यभर व्हायरल ;


वेध माझा ऑनलाइन । आज विधिमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान आ पृथ्वीराजबाबा व देवेंद्र फडणवीस यांच्यात भिडे याना गुरुजी का म्हणतात या विषयावरून चांगलीच चकमक झाली मात्र फडणवीसांनी याचे उत्तर देताना आ चव्हाण यांची खिल्ली उडवत त्यांचा अक्षरश क्लिन बोल्ड केल्याचे पहायला मिळाले
राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरू आहे आज संभाजी भिडे यांच्या महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याच्या मुद्यावरून आ पृथ्वीराज चव्हाण पुन्हा चर्चा करताना दिसले... यावेळी भिडेंना गुरुजी का म्हणता?...त्यांच्या त्या नावाचा काही पुरावा आहे का?...असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला...त्याचे उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...गुरुजी हे त्यांचे नाव आहे...तुम्हाला पृथ्वीराज बाबा म्हणतात ...मग तुम्हाला बाबा का म्हणतात... याचा पुरावा मी मागू का...? असा उलटा सवाल करत त्यांनी पृथ्वीराज बाबांचा त्यावेळी अक्षरशः क्लिन बोल्ड केला...
मताच्या राजकारणासाठी पृथ्वीराजबाबा या विषयाला धरून  बोलत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला ...

दरम्यान पृथ्वीराज बाबांनी भिडे गुरुजींच्या महात्मा गांधीबाबतच्या केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भिंडेना अटक करण्याची मागणी केली होती त्यांनतर पृथ्वीराज बाबांना नांदेड च्या एका युवकांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती 

आज पुन्हा विधिमंडळ कामकाजावेळी पृथ्वीराज चव्हाण व फडणवीस यांच्यात भिडेंच्या नावाच्या मुद्यावरून चकमक पहायला मिळाली त्यावेळी फडणवीसांनी उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण  यांची खिल्ली उडवत त्यांचा क्लिन बोल्ड केल्याची चर्चा सध्या सुरू आहे या एकूणच चर्चेचा व्हीडिओ सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे 

नगरपालिका व नगरपरिषद यांचे थकीत मुद्रांक शुल्क अनुदान महिन्यात देणार ; आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या लक्षवेधीद्वारे प्रश्नाला मुख्यमंत्री शिंदेंचे उत्तर ...

वेध माझा ऑनलाईन।  राज्यातील ३८५ नगरपालिका व नगरपरिषद यांचे थकीत मुद्रांक शुल्क अनुदान त्वरित देण्यात यावे अशी लक्षवेधीद्वारे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत मागणी केली. या मागणीमुळे राज्यातील  ३८५ नगरपालिका व नगरपरिषद यांना महिन्यातच थकीत अनुदान दिले जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. चव्हाण यांच्या लक्षवेधी सूचनेला दिली. 

राज्यातील सर्व महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये जे काही स्थावर मालमत्तांचे हस्तांतरण होते, खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात त्यावर मुद्रांक शुल्क आकारले जाते. शासनाकडून एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभार लावला जातो. हा अधिभार ज्या परिसरातील मिळकतींचे हस्तांतरण झाले असेल त्या महानगरपालिका किंवा नगरपालिकांना मुद्रांक शुल्क अधिभार दिला जातो. २०१४-१५ ते २०२२-२३ पर्यंत हा मुद्रांक शुल्क अधिभार नगरपालिकांना दिला गेलेला नाही. मात्र मार्च २०२३ साली रु. ७११ कोटी राज्यातील २४ महानगरपालिकांना शासनाने वितरित केलेले आहे. परंतु राज्यातल्या ३८५ नगरपालिका व नगरपंचायती यांना मुद्रांक शुल्कचे अनुदान रु. ५७७ कोटीं २०१४-१५ पासून थकीत आहे. त्यामध्ये जवळपास ७० कोटींचे अनुदान यावर्षी देण्यात आलेले आहे अशी माहिती मिळते. त्यामुळे शासनाने महानगरपालिका व नगरपालिका असा भेदभाव न करता, महानगरपालिकाना जसे थकीत अनुदान दिले तसेच थकित अनुदान नगरपालिका नगरपंचायती यांना सुद्धा त्वरित देण्यात यावे अशी आग्रही मागणी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली.

यापुढे बोलताना आ. चव्हाण म्हणाले कि, नगरपालिका व नगरपरिषद यांचे उत्पन्नाचे साधन मर्यादित असते त्यामुळे त्यांना थकीत रक्कम राहिल्या तर त्याचा शहरातील विकासकामांवर परिणाम होतो. यामुळे नगरपालिकांना मुद्रांक शुल्कचे थकीत अनुदान जर तात्काळ मिळाले तर शहराच्या विकासासाठी ते पैसे वापरले जातील.  

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले कि, महानगरपालिकांना ज्याप्रमाणे थकीत मुद्रांक शुल्क अनुदान दिले गेले त्याचप्रमाणे  ३८५  नगरपालिका व नगरपंचायतीना सुद्धा थकीत मुद्रांक शुल्क अनुदान लवकरात लवकर दिले जाईल. तसेच एक टक्का मुद्रांक शुल्क जे राज्य शासनाला दिले जाते ते इकडे न देता थेट नगरपालिका नगरपरिषदांनाच दिले गेले तर हा थकीतचा प्रश्न राहणार नाही याबाबत महसूल मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

परंतु आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आग्रही मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील  ३८५  नगरपालिका व नगरपंचायती यांचे थकीत मुद्रांक शुल्क अनुदान येत्या महिनाभरात दिले जाईल अशी ग्वाही दिली. 

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या आग्रही मागणीमुळे राज्यातील ३८५ नगरपालिका व नगरपंचायती यांना येत्या महिन्याभरात थकीत अनुदान दिले जाईल.

Tuesday, August 1, 2023

ठाण्याच्या शहापूर येथे गार्डर कोसळून 20 मजुरांचा मृत्यू ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घटनास्थळी दिली भेट.; दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा ;

वेध माझा ऑनलाईन। ठाणे जिल्ह्यातील शहापूरजवळील सरलांबे येथील समृध्दी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना मंगळवारी मध्यरात्री गर्डर कोसळून झालेल्या अपघातात २० मजुरांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाल्याची दुर्घटना घडली. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी घटनास्थळी जाऊन जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसमवेत परिस्थितीची पाहणी केली. तसेच यावेळी दुर्घटनेतील जखमींची रुग्णालयात जाऊन त्यांनी भेट घेतली. रुग्णांची विचारपूस करून शासन आपल्या पाठीशी असल्याचे सांगत, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्याच्या दृष्टीने योग्य ते उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देश यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.   

समृद्धी महामार्गाचे शहापूरजवळील सरलांबे येथे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना मंगळवारी मध्यरात्री प्रिकास्ट केलेला कॉलम बसवताना ही दुर्घटना घडली. दुर्घटनास्थळी भेट देऊन मंगळवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, आज पंतप्रधानांच्या पूर्वनियोजित दौऱ्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे येथे होते. मात्र, दुर्घटनेचे वृत्त समजताच त्यांनी जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून माहिती घेतली. तसेच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांच्या  कुटुंबिंयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, दुर्घटनेची माहिती कळताच एनडीआरएफचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू करण्यात आले. या दुर्घटनेतील जखमींना शहापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींच्या प्रकृतीत तातडीने सुधार होण्याच्या दृष्टीने योग्य ते सर्व उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. 

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करत शासन आपल्या पाठीशी असल्याचे सांगून त्यांना धीर दिला. तसेच दुर्घटनेबाबत मा. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांप्रमाणे तातडीने सखोल चौकशी करण्याच्या सूचनाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यासमयी शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्यासह जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कराडातील अलबिक्स हॉटेलचे अतिक्रमण पालिकेने हटवले ; पोलीस बंदोबस्तात केली कारवाई ;

वेध माझा ऑनलाईन। । कराड शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणात वाढ झाली कि त्यांवर पालिकेच्या वतीने वेळोवेळी कारवाई केली जाते. कारवाई अगोदर नोटीस देखील दिली जाते. अशी कारवाई आज कराड पालिकेकडून अजंठा ट्रान्सपोर्ट समोरील अलबिक्स हॉटेलवर करण्यात आली. यावेळी जेसीबी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने पोलीस बंदोबस्तात पालिकेच्या २५ कर्मचाऱ्यांनी अनधिकृत अतिक्रमण हटवले.  

कराड येथील पोपटभाई पेट्रोल पंप ते शहर पोलीस ठाणे मार्गावर असलेल्या अजंठा ट्रान्सपोर्ट समोर तमन्ना इरफान सय्यद यांनी अलबिक्स हॉटेल उभारले होते. मात्र, ते अतिक्रमणात येत असल्याने कराड पालिकेकडून तमन्ना सय्यद यांना सहा महिने अगोदर अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस देण्यात आली. तसेच अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधितांनी हॉटेलचे अतिक्रमण न हटवल्यामुळे आज मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पालिकेचे मुख्याधिकारी सहकार खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगररचनाकार अधिकार व २५ स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण हटवले.

यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी हॉटेलचे अनधिकृतपणे बांधलेले शेड, पत्रा, पाठीमागील सिमेंट तसेच विटा यांच्या सहाय्याने केलेले बांधकाम जेसीबीच्या साह्याने हटवण्यात आले.

यावेळी पालिकेच्या सहाय्यक नगररचनाकार अंकिता पवार, नोडल अधिकारी आर. डी. भालदार, मारुती काटरे, दिनकर गायकवाड, सुरेश शिंदे आदींसह 25 आरोग्य विभागाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.

नरेंद्र मोदीसमोर शरद पवारांनी केली सूचक विधाने ; दोन मुद्यावर दिला भर ;

वेध माझा ऑनलाईन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पुण्यात लोकमान्य टिकळ पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला शरद पवार उपस्थित राहणार असल्याने राजकीय वर्तुळात शंका कुशंकांना पेव फुटले होते. मात्र तरी देखील आज पवारांनी या सोहळ्याला उपस्थिती दाखविली. या सोहळ्यात पवार काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. दरम्यान पवारांनी आपल्या भाषणात दोन मुद्द्यांवर भर देत काही सुचक विधाने केली.

या कार्यक्रमाच्या सोहळ्यादरम्यान बोलताना पवारांनी पुण्याचा गौरव करताना शिवरायांनी स्वराज्याची स्थापना याच पुणे जिल्ह्यातून केल्याचे सांगितले. शिवरायांचे बालपण पुण्यात गेले. असे सांगत असताना त्यांनी इतर संस्थाने ही त्या त्या राजांच्या नावाने प्रसिध्दीस आली मात्र शिवरायांचे स्वराज्य हे हिंदवी स्वराज्य होते. ते रयतेचे राज्य होते असे म्हणत शिवरायांचे राज्य हे भोसलेंचे राज्य नव्हते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

याचवेळी बोलताना पवारांनी आणखी एका मुद्द्याला हात घातला. शिवरायांचा पराक्रम सांगत असताना पवार म्हणाले, अलिकडच्या काळात जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला. त्याची मोठी चर्चा झाली. पण पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवरायांनी केला होता असे सांगत त्यांनी शिवकाळातील घटनेचा दाखला दिला. शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून आला होता. तेव्हा शिवरायांनी लाल महालावर हल्ला करुन पहिला सर्जिकल स्ट्राईक केल्याचे पवारांनी यावेळी सांगितले. शरद पवारांनी दिलेल्या या दाखल्यावर खुद्द पंतप्रधानांनी देखील टाळ्या वाजवत त्याला दाद दिली.
यावेळी बोलताना पवारांनी टिळकांच्या स्वातंत्रलढ्यातील योगदानाचा देखील आढावा घेतला. टिळकांनी सुरु केलेल्या शिवजयंती, गणेशोत्सवाचे स्वातंत्र्य लढ्यातील लोकजागृतीसाठीचे महत्व सांगतानाच त्यांनी त्यांच्या जाज्ज्वल्य पत्रकारितेचा देखील उल्लेख केला. टिळकांनी मराठीतील केसरी वर्तमानपत्र आणि इंग्रजीतील मराठा साप्ताहीकातून निर्भिडपणे स्वातंत्र्याविषयी मांडलेल्या भूमिकेचा इतिहास त्यांनी यावेळी सांगितला. पुढे पंतप्रधान मोदी यांनी देखील आपल्या भाषणात पवारांच्या या विधानाचा उल्लेख करत टिळकांच्या पत्रकारितेचा गौरव केला.

बनावट औषधांना आळा बसणार; आजपासून 300 औषधांच्या पॅकेजवर QR कोड अनिवार्य ; महत्वाची बातमी ;

वेध माझा ऑनलाइन। आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात भिती असते की, आपण जी औषधं घेतोय ती बनावट तर नाहीत? पण आता हीच भिती दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. आज 1 ऑगस्ट 2023 पासून केंद्र सरकारनं 300 हून अधिक औषधांवर क्युआर कोड लावण्याचे आदेश जारी केले आहेत. भारताच्या ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडिया नं तसे आदेशच फार्मा कंपन्यांना दिले आहेत. त्यानुसार देशातील टॉप 300 औषधी ब्रँड्सना त्यांच्या औषधांवर क्युआर कोड किंवा बारकोड टाकणं अनिवार्य असणार आहे. औषधांवरील बारकोड स्कॅन केल्यानं तुम्हाला तुमच्या औषधांबद्दल महत्त्वाची माहिती मिळणार आहे. 

कोणकोणत्या औषधांवर लागणार क्युआर कोड? 
 देशातील ज्या टॉप 300 औषधांच्या कंपन्यांना क्यूआर कोड टाकण्याचे निर्देश जारी केले आहेत. त्या कंपन्यांमध्ये एलिग्रा, शेलकेल, काल्पोल, डोलो आणि मेफ्टेल यांसारख्या औषधांच्या कंपन्यांच्या समावेश आहे. भारताच्या ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडिया नं औषध कंपन्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, औषधांवर बारकोड किंवा क्यू आर कोड टाकले नाहीत, तर मात्र औषध कंपन्यांवर कारवाई केली जाऊन त्यांना मोठा दंडही आकारला जाऊ शकतो.

क्यूआर कोडद्वारे नेमकं काय कळणार?
युनिक प्रोडक्ट आयडेंटिफिकेशन कोडद्वारे, औषधाचे योग्य आणि जेनेरिक नाव, ब्रँडचं नाव, उत्पादकाचं नाव आणि पत्ता, बॅच नंबर, उत्पादनाची तारीख, औषधाची एक्सपायरी डेट आणि उत्पादकाचा परवाना क्रमांक हे सर्व माहित असणं आवश्यक असणार आहे.

सरकारला हा निर्णय का घ्यावा लागला? 
देशात वाढत असलेल्या बनावट औषधांच्या व्यवसायाला आळा घालण्यासाठी आणि रोखण्यासाठी केंद्र सरकारनं हे पाऊल उचललं आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये केंद्र सरकारनं असं पाऊल उचलल्याची माहिती दिली होती. त्याअंतर्गत काही काळापूर्वी त्याची अधिसूचना जारी करण्यात आली असून, आज, 1 ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी, सरकारनं औषधं आणि सौंदर्य प्रसाधनं कायदा 1940 मध्ये सुधारणा केली आहे आणि त्याद्वारे औषध कंपन्यांना त्यांच्या ब्रँडवर एच 2/क्युआर
लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे.