Tuesday, August 1, 2023

नरेंद्र मोदीसमोर शरद पवारांनी केली सूचक विधाने ; दोन मुद्यावर दिला भर ;

वेध माझा ऑनलाईन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पुण्यात लोकमान्य टिकळ पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला शरद पवार उपस्थित राहणार असल्याने राजकीय वर्तुळात शंका कुशंकांना पेव फुटले होते. मात्र तरी देखील आज पवारांनी या सोहळ्याला उपस्थिती दाखविली. या सोहळ्यात पवार काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. दरम्यान पवारांनी आपल्या भाषणात दोन मुद्द्यांवर भर देत काही सुचक विधाने केली.

या कार्यक्रमाच्या सोहळ्यादरम्यान बोलताना पवारांनी पुण्याचा गौरव करताना शिवरायांनी स्वराज्याची स्थापना याच पुणे जिल्ह्यातून केल्याचे सांगितले. शिवरायांचे बालपण पुण्यात गेले. असे सांगत असताना त्यांनी इतर संस्थाने ही त्या त्या राजांच्या नावाने प्रसिध्दीस आली मात्र शिवरायांचे स्वराज्य हे हिंदवी स्वराज्य होते. ते रयतेचे राज्य होते असे म्हणत शिवरायांचे राज्य हे भोसलेंचे राज्य नव्हते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

याचवेळी बोलताना पवारांनी आणखी एका मुद्द्याला हात घातला. शिवरायांचा पराक्रम सांगत असताना पवार म्हणाले, अलिकडच्या काळात जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला. त्याची मोठी चर्चा झाली. पण पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवरायांनी केला होता असे सांगत त्यांनी शिवकाळातील घटनेचा दाखला दिला. शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून आला होता. तेव्हा शिवरायांनी लाल महालावर हल्ला करुन पहिला सर्जिकल स्ट्राईक केल्याचे पवारांनी यावेळी सांगितले. शरद पवारांनी दिलेल्या या दाखल्यावर खुद्द पंतप्रधानांनी देखील टाळ्या वाजवत त्याला दाद दिली.
यावेळी बोलताना पवारांनी टिळकांच्या स्वातंत्रलढ्यातील योगदानाचा देखील आढावा घेतला. टिळकांनी सुरु केलेल्या शिवजयंती, गणेशोत्सवाचे स्वातंत्र्य लढ्यातील लोकजागृतीसाठीचे महत्व सांगतानाच त्यांनी त्यांच्या जाज्ज्वल्य पत्रकारितेचा देखील उल्लेख केला. टिळकांनी मराठीतील केसरी वर्तमानपत्र आणि इंग्रजीतील मराठा साप्ताहीकातून निर्भिडपणे स्वातंत्र्याविषयी मांडलेल्या भूमिकेचा इतिहास त्यांनी यावेळी सांगितला. पुढे पंतप्रधान मोदी यांनी देखील आपल्या भाषणात पवारांच्या या विधानाचा उल्लेख करत टिळकांच्या पत्रकारितेचा गौरव केला.

No comments:

Post a Comment