Friday, November 29, 2024

मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्रीपद घेण्यास एकनाथ शिंदे यांचा नकार ; काय घडली घडामोड ;

वेध माझा ऑनलाइन।
 राज्यात सध्या महायुतीच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. यासंदर्भात गुरुवारी रात्री दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली होती. यावेळी भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्यासमोर उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव मांडण्यात आला. तर मुख्यमंत्रीपद हे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला एकनाथ शिंदे हेदेखील मुख्यमंत्रि‍पदासाठी इच्छूक होते. मात्र, भाजपन नकार दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीमधून माघार घेतली होती. यानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. मात्र, एकनाथ शिंदे  मुख्यमंत्री पदानंतर खालच्या पायरीवर असणारे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नसल्याची चर्चा आहे. आपल्याऐवजी शिवसेनेतील अन्य एखाद्या नेत्याला उपमुख्यमंत्री पद द्यावे आणि मी सरकारमधून बाहेर राहीन, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. मात्र, भाजपला एकनाथ शिंदे यांची ही भूमिका मान्य नसल्याचे समजते. यामागे अनेक राजकीय कारणं असल्याचे समजते.


सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करावे, अशी मागणी केल्याची माहिती आहे. मात्र, भाजप ही मागणी मान्य करेल, असे दिसत नाही. कारण श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री केल्यास ते थेट अजित पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या पंक्तीला येऊन बसतील. श्रीकांत शिंदे यांचा राजकीय अनुभव हा अजित पवारांपेक्षा बराच कमी आहे. याशिवाय, श्रीकांत शिंदे हे आक्रमक आहेत. उपमुख्यमंत्री पदावर बसणाऱ्या व्यक्तीने सरकारमध्ये कोणतेही निर्णय घेताना आक्रमक भूमिका घेतल्यास समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. तसेच शिंदे गटातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलून श्रीकांत शिंदे यांना मुख्यमंत्रीपद बसवल्यास घराणेशाहीचा आरोप होऊ शकतो. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या मोबदल्यात भाजपकडे गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम यासारखी महत्त्वाची खाती मागितली आहेत. त्यांच्या या मागण्या मान्य होणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

जितेंद्र आव्हाड अचानक एकनाथ शिंदेंच्या भेटीला ;

वेध माझा ऑनलाइन।
 राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी गेले आहेत. या भेटीमागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पण या दोन नेत्यांच्या भेटीची चर्चा मात्र आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि राज्यात महायुती सरकार पुन्हा आले. त्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची बदली मात्र झालं असून ते भाजपच्या वाट्याला जाणार हे नक्की झालं आहे. त्यामुळे राज्याचा कारभार सध्या काळजीवाहू मुख्ममंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच पाहत आहेत. आता त्यांच्या भेटीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवनियुक्त आमदार जितेंद्र आव्हाड पोहोचले आहेत.त्यांच्यात चर्चा काय झाली हे अद्याप समजले नाही

एकनाथ शिंदेंनी अमित शाह याना काय केली मागणी ; अजितदादा आणि फडणवीसांसमोर शिंदेंनी केली मागणी;

वेध माझा ऑनलाइन ।राज्याच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल (28 नोव्हेंबर) रात्री दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक झाली.  अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह इतर नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रि‍पदाबाबत देखील चर्चा झाली. मात्र या अमित शाह यांच्यासोबतच्या झालेल्या कालच्या दिल्लीतील बैठकीत एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमोर गुगली टाकत अमित शाह यांच्याकडे केली एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून 12 मंत्रिपदांची अमित शाह यांच्याकडे मागणीसोबतच विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील मागणी करण्यात आली. मंत्रिपदात गृह, नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा, अशी एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांना विनंती केली आहे. त्यामुळे गृह खातं भाजप एकनाथ शिंदेंना देणार का?, हे आगामी दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.

बैठकीत ठरलं!! मुख्यमंत्री होणार फडणवीसच ; फडणविस आणि अजितदादांनी बैठकीचे फोटो केले शेअर, एकनाथ शिंदे यांनी मात्र फोटो शेअर केले नाहीत ;

वेध माझा ऑनलाइन।
महायुती सरकारच्या सत्तास्थापनेसंदर्भात गुरुवारी रात्री दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी रात्री साडेदहा ते 12 वाजेपर्यंत ही बैठक सुरु होती. या बैठकीला देवेंद्र फडणवीस अजित पवार, एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, प्रुफल पटेल आणि जे.पी. नड्डा उपस्थित होते. या बैठकीत महायुतीच्या नेत्यांमध्ये राज्याचा पुढील मुख्यमंत्री  आणि खातेवाटपाच्यादृष्टीने चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीला देवेंद्र फडणवीस हे नेहमीपेक्षा वेगळ्या पेहरावात आले होते. राज्याचा नवा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होण्याची आता केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. काल दिल्लीतील बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि हास्य बरेच काही सांगून जाणारे होते. यावेळी अजित पवार यांचा चेहराही उत्साहाने ओसंडून वाहत होता. याउलट काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर मात्र चिंतेची काजळी दाटल्याचे दिसून आले. या गोष्टीची सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा सुरु आहे. 
या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या हताश बॉडी लँग्वेजसोबत आणखी एक गोष्ट अनेकांच्या नजरेत भरणारी ठरली. ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटला तत्परतेने अमित शाह यांच्याकडून पुष्पगुच्छ घेतानाचा फोटो शेअर केला. पण एकनाथ शिंदे यांनी अद्याप अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीचा एकही फोटो सोशल मीडियावर टाकलेला नाही. एरवी एकनाथ शिंदे त्यांचा कार्यक्रम, सभा आणि गाठीभेटींचे फोटो तत्परतेने सोशल मीडियावर टाकतात. मात्र, संपूर्ण रात्र उलटून गेल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील बैठकीचा एकही फोटो शेअर केलेला नाही. या गोष्टीचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Thursday, November 28, 2024

मंत्रिमंडळात 4 महिला आमदार मंत्री होणार !

वेध माझा ऑनलाइन
राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आघाडीने मोठं यश मिळवलं. मोठ्या प्रमाणावर जागा जिंकून पुन्हा एकदा ते राज्यात सत्ता स्थापन करणार आहे. त्यासाठीच्या हालचाली देखील सुरू आहेत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रीपदे यांच्याबाबतच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी देणार महायुती सरकार आता महिलांना सत्तेत वाटा देणार आहे. नव्या सरकारमध्ये 4 महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणारअसल्याची माहिती आहे. महायुती सरकारमध्ये मंत्री मंडळात लाडक्या आमदार बहिणींची संख्या वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपकडून यंदा विधान सभेवर 14 महिला आमदार निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या 4 तर शिवसेनाकडून 2 आमदार विधानसभेवर निवडून आल्या आहेत. दरम्यान भाजपचा गड राखून ठेवलेल्या महिला आमदारांची मंत्री मंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. मंत्री पदे देण्याच्या अनुषंगाने महिला आमदारांचे प्रोफाइल दिल्लीत मागविले असल्याची माहिती आहे. यामध्ये अदिती तटकरे यांचे नाव प्रामुख्याने घेतलं जात आहे. याआधी देखील मंत्रिमंडळात त्यांच्याकडे महिला व बालविकास खात राहिलं आहे, तर दुसरीकडे देवयानी फरांदे भाजपच्या आमदार आहेत, त्यांच्या सुद्धा नावाची चर्चा आहे. त्याचबरोबर श्वेता महाले या देखील भाजपाच्या आमदार आहेत. त्यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणखी एका महिला आमदाराचं नाव चर्चेत आहे. तर शिवसेनेकडून एक महिला आमदार नाव चर्चेत असल्याची माहिती आहे.

Wednesday, November 27, 2024

मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीचा कोणताही उमेदवार असेल, त्याला आपला पाठिंबा असेल ; एकनाथ शिंदे ;

वेध माझा ऑनलाइन
मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलं. त्यांनी गेल्या अडिच वर्षा केलेल्या कामामुळं लोकांची सेवा करता आली हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे, असं सांगितलं. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मोदी साहेबांनी दिली, त्यांचे आभार  शिंदे यांनी मानले. यावेळी मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीचा कोणताही उमेदवार असेल, त्याला आपला पाठिंबा असेल असं सांगून एकनाथ शिंदे हे बॅक फुटावर आल्याचे दिसले तसंच उद्या दिल्लीत अमित शाह यांच्याबरोबर बैठक होईल, त्यावेळी निर्णय होईल असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं जो निर्णय घेईल त्याला पूर्णपणे शिवसेनेचं पूर्णपणे समर्थन असेल असेही ते  म्हणाले

एकनाथ शिंदे नाराज ; गाठीभेटी टाळल्या;

वेध माझा ऑनलाइन ।
विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश मिळालं. मात्र, त्या यशानंतर आता मुख्यमंत्री पदाचा आणि नाराजीनाट्याचा सुर राज्यभरात दिसून येत आहे. अशातच महायुतीच्या यशानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे, अशातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात असतानाच एकनाथ शिंदे नाराज झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

यादरम्यान त्यांनी बोलणं आणि भेटणं देखील टाळलं आहे. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या आमदार, खासदार यांच्या भेटी देखील त्यांनी टाळल्या आहेत, त्यांनी भेटी का टाळल्या त्याचबरोबर त्यांनी मौन का बाळगलं आहे, याचं नेमके कारण समजू शकलं नसलं तरीदेखील एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे.