वेध माझा ऑनलाइन।
राज्यात सध्या महायुतीच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. यासंदर्भात गुरुवारी रात्री दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली होती. यावेळी भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्यासमोर उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव मांडण्यात आला. तर मुख्यमंत्रीपद हे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला एकनाथ शिंदे हेदेखील मुख्यमंत्रिपदासाठी इच्छूक होते. मात्र, भाजपन नकार दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमधून माघार घेतली होती. यानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदानंतर खालच्या पायरीवर असणारे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नसल्याची चर्चा आहे. आपल्याऐवजी शिवसेनेतील अन्य एखाद्या नेत्याला उपमुख्यमंत्री पद द्यावे आणि मी सरकारमधून बाहेर राहीन, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. मात्र, भाजपला एकनाथ शिंदे यांची ही भूमिका मान्य नसल्याचे समजते. यामागे अनेक राजकीय कारणं असल्याचे समजते.
सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करावे, अशी मागणी केल्याची माहिती आहे. मात्र, भाजप ही मागणी मान्य करेल, असे दिसत नाही. कारण श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री केल्यास ते थेट अजित पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या पंक्तीला येऊन बसतील. श्रीकांत शिंदे यांचा राजकीय अनुभव हा अजित पवारांपेक्षा बराच कमी आहे. याशिवाय, श्रीकांत शिंदे हे आक्रमक आहेत. उपमुख्यमंत्री पदावर बसणाऱ्या व्यक्तीने सरकारमध्ये कोणतेही निर्णय घेताना आक्रमक भूमिका घेतल्यास समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. तसेच शिंदे गटातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलून श्रीकांत शिंदे यांना मुख्यमंत्रीपद बसवल्यास घराणेशाहीचा आरोप होऊ शकतो. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या मोबदल्यात भाजपकडे गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम यासारखी महत्त्वाची खाती मागितली आहेत. त्यांच्या या मागण्या मान्य होणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
No comments:
Post a Comment