Friday, November 29, 2024

बैठकीत ठरलं!! मुख्यमंत्री होणार फडणवीसच ; फडणविस आणि अजितदादांनी बैठकीचे फोटो केले शेअर, एकनाथ शिंदे यांनी मात्र फोटो शेअर केले नाहीत ;

वेध माझा ऑनलाइन।
महायुती सरकारच्या सत्तास्थापनेसंदर्भात गुरुवारी रात्री दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी रात्री साडेदहा ते 12 वाजेपर्यंत ही बैठक सुरु होती. या बैठकीला देवेंद्र फडणवीस अजित पवार, एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, प्रुफल पटेल आणि जे.पी. नड्डा उपस्थित होते. या बैठकीत महायुतीच्या नेत्यांमध्ये राज्याचा पुढील मुख्यमंत्री  आणि खातेवाटपाच्यादृष्टीने चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीला देवेंद्र फडणवीस हे नेहमीपेक्षा वेगळ्या पेहरावात आले होते. राज्याचा नवा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होण्याची आता केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. काल दिल्लीतील बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि हास्य बरेच काही सांगून जाणारे होते. यावेळी अजित पवार यांचा चेहराही उत्साहाने ओसंडून वाहत होता. याउलट काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर मात्र चिंतेची काजळी दाटल्याचे दिसून आले. या गोष्टीची सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा सुरु आहे. 
या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या हताश बॉडी लँग्वेजसोबत आणखी एक गोष्ट अनेकांच्या नजरेत भरणारी ठरली. ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटला तत्परतेने अमित शाह यांच्याकडून पुष्पगुच्छ घेतानाचा फोटो शेअर केला. पण एकनाथ शिंदे यांनी अद्याप अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीचा एकही फोटो सोशल मीडियावर टाकलेला नाही. एरवी एकनाथ शिंदे त्यांचा कार्यक्रम, सभा आणि गाठीभेटींचे फोटो तत्परतेने सोशल मीडियावर टाकतात. मात्र, संपूर्ण रात्र उलटून गेल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील बैठकीचा एकही फोटो शेअर केलेला नाही. या गोष्टीचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

No comments:

Post a Comment