कराड
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीनं ‘सुपर १०००’ अंतर्गत १ हजार युवकांना सकारात्मक राजकारणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यातील बहुतांश तरूणांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संधी देण्याचे नियोजन आहे. काँग्रेसकडून पहिल्यांदाच हा उपक्रम देशात आणि महाराष्ट्रात राबवण्यात येत असल्याचे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा ‘सुपर १०००’ उपक्रमाचे समन्वयक शिवराज मोरे यांनी सांगितलं. ते कराड येथे पत्रकारांशी बोलत होते.
या उपक्रमविषयी अधिक माहिती देताना शिवराज मोरे म्हणाले कि, ”महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘सुपर १०००’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील एक हजार युवक-युवतींना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसपक्षाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाणार आहे. येत्या २ दिवसात गूगल फॉर्मच्या माध्यमातून या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. या महिनाभरात इच्छुकांना अर्ज करता येणार आहे. आलेल्या अर्जांची छाननी करून एक हजार युवक-युवतींची या उपक्रमासाठी निवड केली जाणार आहे”.
”’सुपर १०००’ माध्यमातून निवड केलेल्या एक हजार युवक-युवतींना, निवडणुकीची तयारी, निवडणूक कशी लढवायची, मीडिया मॅनेजमेंट, बूथ मॅनेजमेंट, स्थानिक प्रश्न सोडवणे अशा विविध विषयावर प्रशिक्षण दिले जाणार आहे. येणाऱ्या एका वर्षात एक हजार युवक-युवतींची फळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसकडून तयार केली जाणार आहे.” ”२०२१ ते मार्च २०२२ यादरम्यान महाराष्ट्रात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका नगर पंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी ‘सुपर १०००’ च्या माध्यमातून एक हजार युवकांना तिकीट देण्याचं काम काँग्रेस करणार असल्याचे” शिवराज मोरे यांनी सांगितलं.
No comments:
Post a Comment