कराड : अंमली पदार्थाच्या सेवनानंतर परदेशी तरुणीने कराड-चिपळूण रोडवर धुडगूस घातल्याचं समोर आलं आहे. आधी बाईक, त्यानंतर रस्त्यावर उभी असलेली जीप पळवून तिने कराडपर्यंत अनेकांना धडका दिल्या. कराडजवळ जीप पलटी झाल्यानंतर हा थरार संपला. परदेशी तरुणीला ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
साताऱ्यात परदेशी युवतीने जीप चोरुन भररस्त्यात अनेकांना उडवल्याचा धक्कादायक प्रकार काल (रविवारी) रात्री घडला. मूळ नेदरलँडच्या असलेल्या पावलीन कोरनेलिया जिसजे या तरुणीने अंमली पदार्थाची नशा केल्याची प्राथमिक माहिती आहे. कराडच्या कृषी महाविद्यालयाजवळ जीप उलटल्यानंतर ती पोलिसांच्या हाती लागली. या घटनेने कराड आणि पाटण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
चिपळूनच्या दिशेने बाईकवरुन आलेल्या परदेशी तरुणीने पाटण नवा रस्ता भागात धुडगूस घातला. यावेळी नागरिकांनी पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. या तरुणीने जवळच्या दुकानासमोर उभी असणारी महिंद्रा जीप पळवून कराडच्या दिशेने पोबारा केला.
जीपचा वेग ताशी शंभरच्या पलिकडे होता. वाटेत तिने अनेकांना जोरात कट मारले तसेच दहा ते बारा जण थोडक्यात बचावले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अखेर कराडमधील कृषी महाविद्यालयात एका वॅगन आर गाडीला धडक देऊन तिची जीप उलटली.
कराड पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन अधिक तपास सुरु केला आहे. अटकेची प्रक्रिया करुन तिला आज न्यायालयात हजार केले जाणार आहे. पोलिस ठाण्यात फक्त अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment