Thursday, September 5, 2024

मला घरी जाऊ द्या, पोलिसांसमोर ढसाढसा रडला जयदीप आपटे;


वेध माझा ऑनलाइन।
मालवण पोलीस, ठाणे पोलीस आणि कल्याण ग्रामीण पोलिसांची पाच पथकं त्याचा कसून शोध घेत होती. मात्र, जयदीप आपटे हा त्यांच्या हाती लागला नव्हता. पण बुधवारी जयदीप आपटे हा कल्याणमधील त्याच्या घरी आला आणि अलगदपणे पोलिसांच्या तावडीत सापडला यानंतर घाबरलेल्या अवस्थेत असलेला जयदीप आपटे हा ढसाढसा रडायला लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, जयदीप आपटे हा कसाऱ्यावरुन लोकल ट्रेन पकडून कल्याण रेल्वे स्थानकात आला. कल्याणला उतरल्यावर जयदीप रिक्षा करत दूध नाका परिसरात उतरला. जयदीपने कोणीही ओळखू नये यासाठी डोक्यावर टोपी, तोंडाला मास्क आणि रुमाल गुंडाळला होता. यावेळी जयदीपच्या हातात दोन बॅगाही होत्या. जयदीप हा टोपी आणि मास्क लावून राहत्या घरी कुटुंबाला भेटण्यासाठी जात होता.पण इमारतीच्या गेटवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलिसांकडून इमारतीमध्ये जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे ओळखपत्र तपासले जात होते. ते ओळखपत्र तपासूनच पोलीस रहिवाशांना इमारतीत सोडत असल्याचे त्याने लांबूनच पाहिलं. यानंतर जयदीप हा इमारतीजवळ आला. पोलिसांनी त्याच्याकडे आयडी कार्ड मागितले. पण त्याने नकार दिला. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्याला त्याचा चेहरा पाहून हा जयदीप आपटेच असावा, असा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला त्याच्या नावाने आवाज दिला. यानंतर घाबरलेल्या अवस्थेत असलेला जयदीप आपटे हा ढसाढसा रडायला लागला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर डीसीपी कार्यालयामध्ये जयदीप आपटेची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर जयदीप आपटेला सिंधुदुर्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

No comments:

Post a Comment