Tuesday, September 3, 2024

शरद पवार यांचा पश्चिम महाराष्ट्रात मोठा डाव? अजितदादा गटाला खिंडार पाडणार; तीन नेत्यांनी घेतली भेट

वेध माझा ऑनलाइन ।

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आता मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. शरद पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्रात मोठा डाव टाकणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. अजितदादा गटाच्या तीन नेत्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे शरद पवार हे अजितदादा गटालाच मोठं खिंडार पाडणार असल्याचं सांगितलं जात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच शरद पवार हा डाव टाकून पश्चिम महाराष्ट्रावर आपला कब्जा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

शरद पवार हे चार दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज त्यांची ए.वाय. पाटील, के. पी. पाटील आणि अशोकराव जांभळे या तिन्ही नेत्यांनी भेट घेतली. केपी पाटील हे माजी आमदार असून अजित पवार गटात आहेत. केपी पाटील आणि एवाय पाटील हे दोघेही नातेवाईक आहेत. या दोन्ही नेत्यांनी एकसाथच शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांशी शरद पवार यांनी स्वतंत्रपणे बैठक घेऊन चर्चा केली.

केवाय पाटील हे राधानगरी भुदरगडमधून लढण्यास इच्छुक आहेत. केपी पाटील हे सुद्धा राधानगरी भुदरगडमधून लढण्यास इच्छुक आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये राधानगरीसाठी रस्सीखेच असून शरद पवार या नेत्यांची कशी समजूत काढतात आणि कुणाला तिकीट देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान अशोकराव जांभळे यांनीही पवारांची भेट घेतली आहे. हातकणंगले मतदारसंघ शरद पवार गटाने लढावा असा जांभळे यांचा आग्रह आहे. त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेतात आणि महाविकास आघाडी शरद पवार गटाला ही जागा सोडणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कोल्हापुरातील 10 जागांवर नजर
कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण 10 जागा आहेत. या चार दिवसांच्या दौऱ्यात शरद पवार हे या दहाही मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. लोकांचा कल समजून घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज दिवस भर शरद पवार यांच्या जिल्ह्यातील नेत्यांशी भेटीगाठी आणि चर्चा होणार आहेत
दरम्यान, समरजित घाटगे आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. समरजित घाटगे यांनी कालच शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. घाटगे यांना शरद पवार हे अजितदादा गटाचे नेते हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उतरवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची होईल असं सांगितलं जात आहे.


No comments:

Post a Comment