वेध माझा ऑनलाइन।
गणेश विसर्जन मिरवणुकीवरील वेळेचं बंधन आणि वाद्यांवरील निर्बंधावरून साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि पालकमंत्री शंभूराज देसाईंनी एकमेकांना आव्हान दिलंय. प्रशासनाने नियमांचा बागुलबुवा उभा करून गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण घालू नये. असे कितीसे पोलीस आहेत. तेवढा पोलीस फोर्स जिल्ह्याला पुरेसा नाही. त्यामुळं इथं पण युपी, बिहारच होईल, या गोष्टीचं पोलिसांनी भान ठेवावं. लाठीचार्ज झाला तर ‘अरे ला कारे’ने उत्तर देता येईल, असं उदयनराजेंनी सुनावलं आहे. उदयनराजेंच्या या आव्हानाला पालकमंत्री शंभूराज देसाईंनी देखील प्रत्त्युतर दिलंय.
साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि पालकमंत्री शंभूराज देसाई या दोघांनी स्वतंत्रपणे माध्यमांशी संवाद साधला. प्रथम उदयनराजेंनी संवाद साधत डॉल्बी वाजवण्यात येणार असल्याचे सांगून टाकले. मुंबई, पुण्यात डॉल्बी वाजविला जात असताना साताऱ्यात याला का बंदी? असा सवाल करत डॉल्बी नियमात राहून वाजवावा, असे म्हंटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन डॉल्बी आणि उदयनराजेंच्या वक्तव्याबाबत सविस्तर भूमिका मांडली. यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले की, त्यांच्या उदयनराजेंचं वक्तव्य आम्ही तपासून घेऊ. शासनाचे नियम आणि हायकोर्टाचे काय निर्देश आहेत, त्याची माहिती उदयनराजेंना दिली जाईल. कोणी नियम आणि कायद्याचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment