निवडणुकीच्या वेळी गल्लीबोळात फिरून मतदारांच्या दारात हात जोडणारे, आश्वासनांचा पाऊस पाडणारे आणि निवडून आल्यानंतर मात्र जनतेच्या प्रश्नांपासून दूर जाणारे लोकप्रतिनिधी नेमके कसे ओळखावेत? कराडमध्ये झळकलेल्या ‘अकार्यक्षम नगरसेवकाची १० लक्षणे’ या फलकाने हाच सवाल थेट आणि बोचऱ्या शब्दांत उपस्थित केला आहे.
नगरसेवकांच्या कार्यपद्धतीपासून जनतेशी असलेल्या संपर्कापर्यंत, विकासकामांच्या गुणवत्तेपासून राजकीय श्रेयवादापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या या फलकाने शहरातील राजकीय चर्चेला नवा तडका दिला आहे.
फलकातील मचकुराचा आशय असा आहे की...
‘नगरसेवक म्हणजे पद नाही, जनतेची जबाबदारी आहे!’ हा फलकावरील संदेश केवळ घोषवाक्य नाही, तर जनतेच्या अपेक्षा आणि लोकप्रतिनिधींच्या कामकाजातील कथित दरी अधोरेखित करणारा राजकीय टोला ठरत आहे. ‘नेत्यांच्या मागे फिरणारा नको, जनतेच्या पुढे उभा राहणारा लोकप्रतिनिधी हवा!’ या शब्दांतून राजकीय नेत्यांच्या मर्जीपेक्षा नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
बेल बाजार रस्त्याचा मुद्दा फलकावर विशेष ठळकपणे मांडण्यात आला आहे. तेथील रस्त्यासाठी निधी येऊन वर्ष झाले, ड्रेनेजचे काम झाले, गॅस पाइपलाइनचे काम झाले; तरी नागरिकांना या त्रासातून कधी मुक्त करणार? असा थेट सवाल करण्यात आला आहे. कारण ड्रेनेज व पाईपलाईन च्या कामाच्या दिरंगाईमुळे रस्ता होत नव्हता असा सूर त्याठिकाणी होता मात्र आता ते काम त्याठिकाणी झाले आहे मग अजूनही विकासकामांच्या नावाखाली नागरिकांना किती काळ धूळ, खोदकाम, वाहतुकीचा त्रास आणि गैरसोयी सहन कराव्या लागणार, हा प्रश्न या फलकातून पुढे आला आहे.
लोकप्रतिनिधी नेत्यांच्या मागे फिरण्यात धन्यता मानतात, झकपक कपडे आणि गॉगल घालून राजकीय वर्तुळात वावरण्यात रस घेतात; मात्र जनतेच्या प्रश्नांसाठी वेळ देत नाहीत, अशी उपरोधिक टीका फलकावर करण्यात आली आहे. प्रभागातील रस्ते खराब असोत, पाणीपुरवठ्याच्या समस्या असोत, गटारे तुंबलेली असोत किंवा दिवे बंद असोत समस्यांची माहिती घेऊन प्रत्यक्ष कामाचा पाठपुरावा करण्याऐवजी प्रसिद्धी आणि राजकीय दिखाव्याला प्राधान्य दिले जात असल्याचा आशय यातून मांडण्यात आला आहे.
फलकावरील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक संपल्यानंतर जनतेशी संपर्क संपवणारे लोकप्रतिनिधी. निवडणुकीच्या काळात नागरिकांच्या दारात जाऊन मत मागणारे, जनतेच्या विश्वासातून निवडून येणारे प्रतिनिधी नंतर नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी किती उपलब्ध असतात? जनतेच्या तक्रारी ऐकणे, प्रभागातील कामांची माहिती ठेवणे आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करणे ही जबाबदारी केवळ निवडणुकीपुरती मर्यादित आहे का? असा अप्रत्यक्ष सवाल या फलकातून उपस्थित करण्यात आला आहे.
प्रत्येक वेळी नवी आश्वासने, कामांच्या घोषणा, प्रसिद्धी आणि श्रेयवाद; पण प्रत्यक्ष काम पूर्ण करण्यासाठी ठोस प्रयत्नांचा अभाव, असा टीकेचा सूरही या फलकावर आहे. विकासकामांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष, नागरिकांच्या पैशातून होणाऱ्या कामांवर देखरेख नसणे आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्याऐवजी राजकीय सोयीला महत्त्व देणे, या प्रवृत्तींवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
दरम्यान
हा फलक कोणत्याही एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून लोकप्रतिनिधींच्या कामकाजाचे मूल्यमापन जनतेच्या निकषांवर व्हावे, असा व्यापक संदेश देणारा आहे.
त्यामुळे जे कोणी अकार्यक्षम लोकप्रतिनिधी असतील त्यांनी याचा जरूर विचार करावा असा सल्लाही यातून देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment