Wednesday, January 4, 2023

धनंजय मुंडेंच्या कारला मोठा अपघात, एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला हलवणार;

वेध माझा ऑनलाइन -  मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतत असताना राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या अपघातामध्ये मुंडे यांच्या छातीला किरकोळ दुखापत झाली आहे. याबाबत मुंडे यांनीच माहिती दिली.

दरम्यान या अपघातानंतर आता मुंडे यांना खबरदारी म्हणून उपचारासाठी मुंबईला घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. थोड्याच वेळात मुंडे यांना परळी वरून लातूर मार्गे विमानाने मुंबईला उपचारासाठी नेलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून आता एसटी महामंडळाच्या साध्या बसेस धावणार नाहीत ; काय आहे कारण ?

वेध माझा ऑनलाइन - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून आता एसटी महामंडळाच्या साध्या बसेस धावणार नाहीत. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून फक्त शिवनेरी बस चालवण्यात येणार आहे. एसटीच्या अनेक साध्या बसेस एक्स्प्रेसवेवरून जात असल्याने त्याचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसत आहे. प्रवासी भारमान कमी होणे आणि टोलचा भार असा दुहेरी फटका एसटी महामंडळाला बसत होता. त्यानंतर आता प्रशासनाला जाग आली आहे. जुन्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरून एसटी बसेस धावत नसल्याने जवळपास 30 ते 50 टक्के प्रवासी भारमान घटले असल्याच लक्षात आले आहे 

एसटी महामंडळाने काही दिवसांपूर्वीच एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, आता एसटीच्या साध्या बस या जुन्या मार्गावरून चालवण्याचे आदेश देण्यात आले आहे. शिवनेरी वगळता इतर एसटी बसने एक्स्प्रेसवेवरून प्रवास केल्यास त्या दरम्यान ई-टॅगमधून वळती करण्यात आलेली अधिकच्या फरकाची रक्कम चालकाकडून वसूल करण्याचे आदेश एसटी प्रशासनाने विभाग नियंत्रकांना दिले आहेत. त्याशिवाय, अशा चालकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधीदेखील, एसटीच्या साध्या बसेस या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून चालवली जात होती. मात्र, काही चालक परस्परपणे एक्स्प्रेसवरून एसटी चालवत असत ही बाब उघडकीस आल्यानंतर एसटी महामंडळाने कठोर भूमिका घेतली आहे.

शरद पवार साताऱ्यात दाखल ; रयत च्या अभिष्टचिंतन सोहळयास लावणार उपस्थिती ;

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्यात दाखल झाले असून आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. दरम्यान, रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय बैठक पार पडत असून याला पवारांनी उपस्थिती लावली आहे.

सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात नुकतीच व्यवस्थापकीय बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीस शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील, खा. श्रीनिवास पाटील, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर उपस्थित आहेत.संस्थेच्या मासिक आढावा बैठकीनंतर दुपारी 2 वाजता रयत शिक्षण संस्थेच्या वतीने शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला पवार उपस्थिती लावणार आहेत. 



Tuesday, January 3, 2023

कोयना पायथा गृहातील 50 तर पोफळी विद्युत गृहातील 450 कर्मचारी संपावर ; महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका कोयना विद्यत प्रकल्पाला ; राज्यातील अनेक ठिकाणची बती गुल ;

वेध माझा ऑनलाईन - आजचा महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका कोयना विद्युत प्रकल्पाला बसला आहे  कोयना पायथा वीज गृहातील दोन निर्मिती संच बंद झाले आहेत.

महावितरणने राज्यभर पुकारलेल्या संपाचा फटका कोयना विद्युत प्रकल्पाला बसताना दिसत आहे. कारण या ठिकाणी असलेले कोयना पायथा वीज गृहातील दोन संच बंद पडले आहेत. त्यामुळे आता राज्यातील अनेक ठिकाणची बती गुल झाली आहे. पाटण तालुक्यासह सातारा शहर व ग्रामीण भागालाही संपाचा फटका बसलेला आहे. अनेक गावातील लाईट गेली आहे. कोयना विद्युत प्रकल्पातील कर्मचारीही संपावर गेल्याने कामावर तुटवडा जाणवू लागला आहे. कोयना पायथा गृह येथील 50 तर पोफळी विद्युत गृहातील 450 कर्मचारी संपावर गेले आहेत. पोफळी येथे 1900 मेगावॅट वीज निर्मिती होत असते. तेथे सध्या विद्युत संच सुरू आहेत. पोफळी येथे सध्या रिटायर कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले आहे. 
नारायण राणेंकडे असलेल्या पीएने या मंत्रालयाच्या माध्यमातून अनेकांना गंडे घातले. पंतप्रधान मोदींना हे जेव्हा कळले तेव्हा त्यांनी राणेंना समज दिली. त्या पीएला आधी हाकला नाहीतर तुमचं मंत्रिपद काढून घेणार, असा इशारा दिला असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.


कणकवली इथं नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी विनायक राऊत, आमदार वैभव नाईक हजर होते. यावेळी राऊत यांनी दिल्लीतील गोष्टीचा मोठा खुलासा केला.
'मागच्या अधिवेशनामध्ये केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे उत्तर दिले होते. या प्रकारानंतर राणे लोकसभेची पायरी चढायचेच विसरले. राणे अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासालाही उपस्थित राहत नाहीत, अशी खरमरीत टीका शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेवंर केली आहे.

'मध्यल्या काळात त्यांनी एक पीए ठेवला होता. या पीएची काम ही फक्त पटवापटवीची होती. अनेकांना त्याने गंडा घातला. मोदी साहेबांच्या हे लक्षात आलं. त्यावेळी, या पीएला आधी हाकलून द्या, नाहीतर मंत्रिपद काढून घेईन, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी नारायण राणेंना झापलं होतं, असा खुलासा विनायक राऊत यांनी केला.

 या महाशयांना धड बोलता येत नाही. मालवणीही नीट बोलता येत नाही. मराठीचा तर पत्ता नाही. फडणवीस या शब्दाचा उच्चार तर करताही येत नाही. दक्षिणेतील एका खासदारने केरळमध्ये कोरोनाच्या काळात लघु उद्योग खात्यातून काय रोजगार देणार, काय उपाययोजना करणार असा प्रश्न विचारला, त्यावर राणे उभे राहिले, आम्हाला वाटलं चांगलं उत्तर देतील, पण प्रश्न होता केरळचा आणि उत्तर दिलं तामिळनाडूचं, तेव्हापासून हे महाशय सभागृहात येत नाही. अधिवेशनाच्या काळात सुद्धा उभे राहिले नाही. MSEM चा फुलफॉर्म काय आहे, हे एकदा तरी सांगा, अशी खिल्लीही राऊत यांनी उडवली

Monday, January 2, 2023

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले वादग्रस्त विधान ; म्हणाले ,औरंगजेब खरंच क्रूर असता तर...चूक लक्षात येताच सारवासारव करण्यासाठी घेतली आणखी एक पत्रकार परिषद ; त्यावेळीही केली पुन्हा चूक ;

वेध माझा ऑनलाइन - विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक होते, असं विधान केलं. अजित पवारांच्या या विधानावरून वाद निर्माण झाला, तसंच भाजपने अजित पवारांनी माफी मागावी अशी मागणी केली. अजित पवारांची बाजू लावून धरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारानी वादग्रस्त विधान केलंय. या वादग्रस्त विधानानंतर सारवासारव करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक पत्रकार परिषद घेतली, पण त्यातही जितेंद्र आव्हाड यांनी चूक केली.

'संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचं मंदीर होतं, ते औरंगजेबाने तोडलं नाही, तो क्रूर असता तर त्याने विष्णूचं मंदीर तोडलं असतं ना,' असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं. या विधानामुळे वाद होईल हे लक्षात आल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा लगेचच पत्रकारांना बोलावून दुसरी प्रतिक्रिया देत औरंगजेब क्रूर होता, अशी सारवासारव केली, पण ही सारवासारव करताना जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक चूक केली.

औरंगजेबाचा मृत्यू औरंगाबादमध्ये झाल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. औरंगजेबाचा मृत्यू नगर जिल्ह्यातल्या भिंगारमध्ये झाला होता, पण औरंगजेबाच्या इच्छेनुसार औरंगाबादमध्ये त्याचा दफनविधी करण्यात आला होता. दरम्यान औरंगजेबाच्या मृत्यूबाबत आपण चुकीची माहिती दिल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी मान्य केलं आहे.
वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा स्पष्टीकरण दिलं, ज्यात ते औरंगजेब क्रूर होता, असं ते म्हणत आहेत. 'औरंगजेब किती क्रूर होता हे इतिहासात लिहून ठेवलं आहे. त्याने भावाला, वडिलांना मारलं आणि गादीवर बसला. औरंगजेब क्रूरच होता पण त्याला महाराष्ट्र कधीही जिंकता आला नाही,' असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.


मध्यरात्री गस्त घालताना पोलीसानाच दमदाटी आणि मारहाण ! साताऱ्यातील घटना ;

वेध माझा ऑनलाइन - साताऱ्यात शिवराज पेट्रोल पंपनजीक असलेल्या एका हाॅटेलजवळ गोंधळ सुरू होता. पोलिसांनी गोंधळ घालणार्याना तेथून जाण्यास सांगितल्याने फाैजदारासह पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे संतोष ज्ञानोबा शेलार असे हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, तक्रारदार पोलिस संतोष शेलार हे मध्यरात्री गस्त घालत होते. त्यांच्यासोबत फौजदार वाघमोडे होते. रात्री दीड वाजता शिवराज पेट्रोल पंप परिसरात एका हॉटेलजवळ  काहीजण गोंधळ घालत होते. पोलिसांनी त्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले. तेव्हा, संशयित अक्षय पवार व त्याच्या दोन्ही साथीदारांनी पोलिसांना दमदाटी करण्यास सुरुवात केली.एका संशयिताने तक्रारदार पोलिसाला धक्काबुक्की तर केलीच शिवाय त्यांच्या डोळ्यावर गाडीच्या चावीने हल्लाही केला. यामध्ये ते जखमी झाले आहेत. पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.