वेध माझा ऑनलाईन - शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्यात आल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर आता शिवसेना भवन, शिवसेनेच्या शाखा आणि सामना वृत्तपत्राचा ताबाही एकनाथ शिंदेंकडे जाणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यासाठी या वास्तूंची मालकी आणि कायदेशीर बाजू महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
मुंबईमध्ये शिवसेनेच्या जवळपास 480 पेक्षा जास्त शाखा आहेत. दादर शिवाजी पार्कसारख्या प्राईम लोकेशनवर शिवसेना भवन आहे. शिवसेना भवन आणि शिवसेनेच्या शाखा या शिवाई ट्रस्टच्या मालकीच्या आहेत. शिवाई ट्रस्टचं मुख्य कार्यालय शिवसेना भवनमध्येच आहे. शिवाई ट्रस्टवर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, सुभाष देसाई, अरविंद सावंत आणि दिवाकर रावते हे ट्रस्टी आहेत.
शिवसेनेचं मुखपत्र असलेलं सामना हे वृत्तपत्र आणि मार्मिक हे साप्ताहिक प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेडच्या अंतर्गत येतं. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजच्या वेबसाईटवर असलेल्या माहितीनुसार या कंपनीवर सध्या दोन बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत. संजय रामचंद्र वाडेकर आणि विवेक तातोजीराव कदम या दोन व्यक्ती प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेडच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत. 2018 पर्यंत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे डायरेक्टर पदावर होते, पण नंतर त्यांनी राजीनामा दिला. प्रबोधन प्रकाशनमध्ये वाडेकर आणि कदम हे डायरेक्टर असले तरी कंपनीचे सर्वाधिक शेअर ठाकरे कुटुंबाकडेच असल्याचं सांगितलं जातं.
शिवसेनेच्या मुंबईतल्या शाखा, शिवाजी पार्क जवळ असलेलं शिवसेना भवन, प्रभादेवीचं सामना कार्यालय या एकूण मालमत्तेची सध्याची किंमत शेकडो कोटींच्या घरात आहे, पण ही मालमत्ता शिवाई ट्रस्ट आणि प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर आहे.
शिंदे गटाने शिवसेना आणि मुंबई महापालिकेतल्या शिवसेना कार्यालयावर दावा केल्यानंतर आता त्यांचा मोर्चा शिवसेना भवन आणि सामना कडे वळणार का? असं प्रश्न उपस्थित केला जातोय, पण कायदेशीरदृष्ट्या शिंदे गटाला शिवसेना भवन आणि सामना वर ताबा मिळवता येणार नाही.
शिवसेना भवन, मुंबईतल्या शिवसेना शाखा आणि सामना जर शिवसेना पक्षाच्या नावावर असता तर शिंदेंना यावरही दावा करता आला असता. पण शिवसेना भवन ट्रस्टच्या नावावर आणि सामना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यामुळे शिंदे गटाला यावर दावा करता येणार नाही, असं कायदेतज्ज्ञ सांगतात.
No comments:
Post a Comment