वेध माझा ऑनलाईन - उंडाळे ता. कराड येथील स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या 49 व्या स्मृतीदिनानिमित्त 40 वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळावा शनिवार दि. 18 फेब्रुवारी रोजी होत आहे. अधिवेशनात यावर्षीचा मानाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार नाम फाउंडेशन च्या माध्यमातून सुरू असलेले कार्य व प्रबोधनातील क्षेत्राबद्दल प्रतिभावंत अभिनेते मकरंद अनासपुरे यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे माजी राज्यपाल, खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे 51 हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाळ, श्रीफळ असे पुरस्कारचे स्वरूप आहे. दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त व रयत साखर कारखान्याचे चेअरमन अॅड.उदयसिंह पाटील व व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा.गणपतराव कणसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.यावेळी प्रा.धनाजीराव काटकर, यांची उपस्थिती होती. शनिवार दि. 18 रोजी दुपारी दोन वाजता स्वा. दादा उंडाळकर स्मारक मंदीर उंडाळे येथे अधिवेशनात पुरस्काराचे वितरण होणार आहे.
मकरंद अनासपुरे हे प्रतिभावंत कलाकार असून कला प्रबोधन क्षेत्रात त्यांचे गेले पंचवीस वर्षे योगदान आहे याबरोबर प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्याबरोबर नाम फाउंडेशन च्या माध्यमातून महाराष्ट्रभर फार मोठे समाजकार्य सुरू असून या एकंदरीत योगदानाबद्दल मकरंद अनासपुरे यांचा दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
माजी मंत्री स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांनी वडील स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्य स्तरीय स्वातंत्र सैनिकांचे अधिवेशन व समाजप्रबोधन कार्यक्रम सुरू केले होते. 1973 पासून ही परंपरा अखंड सुरू आहे. उंडाळकर यांच्या पश्चात स्मारक समितीने अॅड. उदयसिंह पाटील याच्या नेतृत्वाखाली ही परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. स्व. विलासराव उंडाळकर यांच्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता.स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्काराने आत्तापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये स्वातंत्र सेनानी माजी राजदूत एन.जी.गोरे, सुप्रसिध्द कवी ना.धो. महानोर, स्वातंत्र्य सेनानी श्रीमती उषा मेहता, स्वा.से. गोविंदभाई श्रॉफ, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती निलमताई देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते मोहन धारीया, स्वा.से. व साहित्यिक जी.पी. प्रधान, प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर, सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, सामाजिक कार्यकर्ते शांताराम गरूड, शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य पी.बी.पाटील, स्वा.सै. प्रभाकररावजी कुंटे, न्यायमूर्ती पी.बी. सावंत, कृषीतज्ज्ञ डॉ. जयंत पाटील, पत्रकार पी. साईनाथ, प्रसिध्द वकील अॅड. उज्ज्वल निकम, डॉ. अभय बंग, जे.जे. रूग्णालयाचे नेत्रतज्ज्ञ तात्याराव लहाने, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, अर्थशास्त्रज्ञ निळकंठ रथ, लेखक व विचारवंत डॉ. सदानंद मोरे, डॉ. प्रकाश आमटे, स्वातंत्र्य सेनानी भाई वैद्य, लेखक सुरेश व्दादशीवार, डॉ. विवेक सावंत, पद्मश्री डॉ.गणेश देवी, पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांचा समावेश आहे.सदर राष्ट्रीय कार्यक्रमास महाराष्ट्र सैनिक स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार, माजी सैनिक उपस्थित राहणार असून तालुक्यातील शेतकरी, माजी सैनिक, युवक, महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वा दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने शेवटी ऍड उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी केले.
No comments:
Post a Comment