Monday, February 6, 2023

आ पृथ्वीराज चव्हाण यांची यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांशी झाली होती चर्चा ; कराडच्या पाणीपुरवठा योजनेमध्ये त्रुटी लक्षात आल्यानेच जिल्हाधिकाऱ्यांनी दिली तुर्तास स्थगिती ; ऋतुराज मोरे यांचे निवेदन

वेध माझा ऑनलाईन ; कराड शहराच्या २४ × ७ पाणी योजनेच्या तिमाही बील आकारणीवरून कराड शहरातील नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे . याबाबत शहर काँग्रेसचे पदाधीकारी व कार्यकर्ते एप्रिल २०२२ पासून कराडचे मुख्याधिकारी डाके यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत . पाणी योजनेची बिले भरमसाठ आल्याने व हवेमुळे मीटर फिरत असल्याने कराडकर नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाणीबीलांमध्ये ३० टक्के सवलत देण्यात यावी अशी आग्रही मागणी कराड शहर काँग्रेसच्यावतीने मुख्याधिकारी कराड नगरपरिषद, कराड यांचेकडे यापूर्वी वारंवार करण्यात आली आहे पाण्याचा दर प्रती १००० लिटरला ८ रूपये असून त्यामध्येसुद्धा ३० % कपात करावी . २४x ७ पाणी योजना पूर्ण ताकतीनिशी सुरू होई पर्यंत मीटरनुसार बील आकारणी करू नये अशी शहर काँग्रेसच्यावतीने मागणी करण्यात आली होती मुख्याधीकारी यांच्याशी चर्चा करून नागरीकांना दिलासा देण्याबातच्या सुचना पृथ्वीराज बाबांनी त्यावेळी दिल्या होत्या तसेच जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्याबरोबरदेखील बाबांनी याबाबत चर्चा केली होती त्यानुसार कराडच्या पाणीपुरवठा योजनेमध्ये असणाऱ्या त्रुटी लक्षात आल्यानेच जिल्हाधिकारी यांनी या बील आकारणीस स्थगिती दिली आहे अशी माहिती शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे

सदर प्रश्न सोडविण्यासाठी कराडच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन आम्ही दिले त्यानंतर कराड शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी  जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांना गेल्या आठवड्यात निवेदन दिले आहे या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण ( बाबा ) यांनीही मुख्याधीकारी यांच्याशी चर्चा करून नागरीकांना दिलासा देण्याबातच्या सुचना दिल्या होत्या . त्याचबरोबर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्याबरोबरही चर्चाही केली कराडच्या पाणीपुरवठा योजनेमध्ये असणाऱ्या त्रुटी लक्षात आल्यानेच जिल्हाधिकाऱ्यांनी या बील आकारणीस तुर्तास स्थगिती दिली आहे असेही ऋतुराज मोरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

Sunday, February 5, 2023

अखेर...सातारा जिल्हाधिकाऱ्यांची कराडच्या 24x 7 पाणी योजनेला स्थगिती ; शिंदे गटाचे नेते राजेंद्रसिह यादव यांची माहिती

वेध माझा ऑनलाईन -शिंदे गटाचे नेते राजेंद्रसिह यादव व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेतली यावेळी यादव यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत कराडच्या वाढीव पाणी बिलाबाबत  वस्तुस्थिती सांगितली त्यानंतर तात्काळ जिल्हाधिकारी जयवंशी यांनी राजेंद्रसिंह यादव यांच्या निवेदनावर शेरा मारून या योजनेला स्थगिती दिली आहे त्यामुळे यादव यांचा पाठपुरावा यशस्वी झाला आहे आणि 24x7 पाणी योजनेचा विषय यानिमित्ताने तूर्तास थांबला आहे
गटनेते राजेंद्रसिह यादव यांनी शहरातील लोकांना वेठीस धरू नका 24x 7 पाणी पुरवठ्याचे भूत लोकांना परवडणारे नाही हे सांगत पाणी बिलात  50 टक्के सूट द्या असे प्रशासनाला ठणकावून सांगितले होते त्यानंतर याबाबतचा पाठपुरावा करताना मागील आठवड्यात त्यांनी मुंबई येथे जाऊन जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्हाधिकारी जयवंशी व शिंदे गटाचे जिल्ह्याचे नेते शरद कणसे यांची एकत्रित मीटिंग घेत या विषया संबंधी सरकार दरबारी दाद मागितली होती 
आज पुन्हा सातारा येथे राजेंद्रसिंह यादव व स्वतः पालकमंत्री देसाई यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन यावर चर्चा केली त्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी या प्रश्नाबाबत कराड शहरातील या योजनेला ताबडतोब स्थगिती देण्याबाबत शेरा दिला असल्याचे राजेंद्रसिह यादव यांनी सांगीतले

दरम्यान कराड शहरात पालिकेने मीटर प्रमाणे पाणी बिल आकारणी सुरू केली आहे  यामधून बिलाची रक्कम भरमसाठ आल्याने कराडच्या लोकशाही आघाडीने पाणी बिलात नागरिकांना 20 टक्के सूट द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर शहर काँग्रेसने डाके यांची भेट घेऊन 30 टक्के सवलतीची मागणी केली तर यशवन्त विकास आघाडीने तर 50 टक्के सवलत देण्याची मागणी केली आहे या योजनेचे काम अद्याप चालू आहे ही योजना सदोष आहे आणि लोकांना परवडणारी नाही त्यामुळे जोपर्यंत यातील दोष दूर होत नाही तोपर्यंत ही योजना स्थगित रहावी अशी मागणीही यादव यांनी केली दरम्यान या मागणीचा आज राजेंद्रसिह यादव यांनी पाठपुरावा करत पालकमंत्री देसाई व जिल्हाधिकारी जयवंशी यांच्याशी चर्चा करून या योजनेला स्थगिती मिळवण्यात यश मिळवले आहे

अदानीला कर्ज दिल्या प्रकरणी राज्यातील स्टेट बँक व एल आय सी समोर काँग्रेसची आंदोलने होणार ;आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल ...

वेध माझा ऑनलाईन - देशातील उद्योजक असलेले अदानी आज मोदींसोबतच्या मैत्रीमुळे कमी वेळात देशातील एक नंबर चे श्रीमंत उद्योजक झाले मात्र आज अदानी व मोदी यांच्या मैत्रीमुळे देश विकला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.अदानीला स्टेट बँक व एल आय सी च्या माध्यमातून दिलेल्या कर्जामुळे देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे या संस्थांनी कोणाला विचारून ही कर्जे दिली? याबाबत आम्ही जाब विचारणार आहोत त्यासाठी लवकरच पूर्ण राज्यभर स्टेट बँक व एल आय सी समोर आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड येथे दिला 

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या समारोपनंतर आता काँग्रेस कडून हात से हात जोडो हे अभियान सुरु केले आहे. या अभियानाचा सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण, कराड उत्तर व कराड शहर काँग्रेस कमिटी चा एकत्रित शुभारंभ आज कराड येथील स्व. स्वा. सै. शामराव पाटील फळ व भाजीपाला मार्केट येथे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते

या कार्यक्रमांस राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहराज्यमंत्री आ. सतेज पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच या शुभारंभ कार्यक्रमांस महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी, सातारा जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अल्पना यादव उपाध्यक्ष गीतांजली थोरात, जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक अध्यक्ष झाकीर पठाण, राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, मंगल गलांडे, पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील, उत्तमराव पाटील, मलकापूर नगराध्यक्षा निलम येडगे, कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा विद्याताई थोरवडे, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, फारूक पटवेकर, मलकापूर नगरसेवक राजेंद्र यादव, युवक काँग्रेसचे अमित जाधव, राहुल पवार, अभिजीत पाटील, अमोल नलवडे आदीसह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड उत्तर काँग्रेस अध्यक्ष निवासराव थोरात, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे उपस्थित होते

आ. पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की,  भारत जोडो यात्रा राहुल गांधींच्या पुढाकाराने यशस्वी झाली काँग्रेस पक्षाचा देशप्रेमाचा विचार देशभर पसरवीता आला. आता पक्षाने सुरु केलेले हात से हात जोडो अभियान आपण तंतोतंत उभारून सोशल मीडिया, पारंपरिक मीडिया यांचा मेळ घालून अभियान यशस्वी केले पाहिजे. देशात द्वेषाचे वातावरण हटविण्यासाठी भारत जोडो यात्रेतून प्रेम भावना, बंधुता पसरविली गेली आता मोदी सरकार च्या गेल्या 8 वर्षातील चुकीच्या निर्णयांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी हात से हात जोडो अभियान प्रभावी ठरणार आहे. नुकताच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी वाढत्या बेरोजगारीवर कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत, ज्या मनरेगा मुळे ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकऱ्यांना हाताला काम व दाम मिळत होते त्या योजनेच्या अनुदानात मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. तसेच आज अदानी व मोदी यांच्या मैत्रीमुळे देश विकला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काही वर्षांपूर्वी एक सामान्य उद्योजक असलेले अदानी आज मोदींसोबतच्या मैत्रीमुळे कमी वेळात देशातील एक नंबर चे श्रीमंत उद्योजक झाले आहेत यामुळेच या बाबतचा संशय येऊन अमेरिकेतील हिंडेनबर्ग संस्थेने रिसर्च करून अदानी च्या मायाजालाचे पुरावे गोळा करून मोठा रिपोर्ट जगजाहीर केला आहे. यामुळेच काँग्रेस सह सर्व विरोधकांची मागणी आहे की या घटनेची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी केली जावी आणि म्हणूनच उद्या काँग्रेस कडून देशभर आंदोलन केले जाणार आहे.

यावेळी माजी गृहराज्यमंत्री आ. सतेज पाटील म्हणाले की, आजचे युग हे डिजिटल युग आहे यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा मोठा उपयोग प्रचारात केला पाहिजे. आज मोठ्या सभा कमी होतील पण ज्यांचा सोशल मीडियावर प्रभाव आहे असा प्रचारच प्रभावी ठरणार आहे. हात से हात जोडो अभियानातून आपल्या मतदारसंघात, तालुक्यात घरोघरी जाऊन अभियाना बद्दल माहिती देऊन मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणविरोधात जनजागृती करण्याची गरज आहे.
यावेळी उदयसिंह पाटील, शिवराज मोरे, प्रा. धनाजी काटकर, निवासराव थोरात, अजितराव पाटील आदींची भाषणे झाली. मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक केले तर राजेंद्र यादव यांनी आभार मानले.
दरम्यान, अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमाआधी कराड व मलकापूर शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली मुख्य रस्त्यावरून मार्केट मधील सभा ठिकाणपर्यंत काढण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Saturday, February 4, 2023

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचं निधन ;

वेध माझा ऑनलाइन - पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचं आज दुबईच्या रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं आहे. परवेज मुशर्रफ यांच्या निधनाबद्दल पाकिस्तानच्या वृत्तवाहिनीकडून माहिती देण्यात आली आहे.त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून दुबईमध्ये उपचार सुरू होते. दीर्घ आजारपणामुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.

कोण आहेत परवेज मुशर्रफ?
परवेज मुशर्रफ हे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. तसेच ते निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी देखील आहेत. 1999 साली पाकिस्तानचे लष्करप्रमुख असताना त्यांनी भारताविरूद्ध कारगील युद्ध पुकारले, मात्र या युद्धामध्ये पाकिस्तानचा दारूण पराभव झाला. या युद्धाची कल्पना पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना देण्यात आली नव्हती. यावरून परवेज मुशर्रफ आणि नवाझ शरीफ यांच्यामध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले.


 

कराडात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे शानदार उदघाटन ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लिबर्टी मैदानाच्या विकासासाठी 2 कोटींचा निधी ;


वेध माझा ऑनलाईन - 
राज्य शासनाच्या माध्यमातुन कला व क्रिडा क्षेत्राला चालना देण्याचे काम करण्यात येत आहे. याच माध्यमातुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराडला इनडोअर स्डेडीयम व लिबर्टी मैदानाच्या विकासासाठी 2 कोटी 55 लाख रूपयांचा निधी मंजुर केला आहे. असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासादार डॉ.श्रिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लिबर्टी मजदूर मंडळ व रणजीत पाटील मित्र परीवाराच्या वतीने कराडला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 4 ते 9 फेब्रुवारी दरम्यान लिबर्टीच्या मैदानावर होणाऱया या कबड्डी स्पर्धेचे उदघाटन पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी, लिबर्टी मजदूर मंडळाचे अध्यक्ष सुभाषराव पाटील, उपाध्यक्ष अरुण जाधव, सचिव रमेश जाधव, विजय गरुड, सचिन पाटील, रणजीत पाटील, मुनीरभाई बागवान, काशिनाथ चौगुले, राजेंद्र जाधव, दादासाहेब पाटील, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सदस्य बाबुराव चांदोरे आदींची प्रमुख उपस्थीती होती.
नामदार शंभुराज देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभर विविध सामाजीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. कला क्रिडा, विद्यार्थांना साहीत्य वाटप, गरजूंना धान्य वाटप, रक्तदान शिबिर आदी पकारचे समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. तर बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या शाखांचे उदघाटनही मोठयाप्रमाणात करण्यात येत आहे.
कबड्डी हा ग्रामिण बाज असलेला मैदानी खेळ आहे. राज्य व देशपातळीवर कबड्डी खेळ मोठयाप्रमाणात खेळण्यात येत आहे. कराडला लिबर्टी मजदुर मंडळ व रणजीत पाटील यांच्या माध्यमातुन भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे आपल्या ग्रामणि भागातील खेळाडुंना चांगले प्रोत्साहन मिळणार असल्याचे प्रतिपादन ना.शुभुराज देसाई यांनी केले.
यावेळी, अतुल शिंदे, जितेंद्र जाधव, भास्कर पाटील, बाळासाहेब मोहिते, बाळासाहेबांची शिवसेना सातारा जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार,  माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, नवनाथ पालेकर, शंभूराज रैनाक, राजेंद्र (आबा) यादव, राजेंद्र माने, घनश्याम पेंढारकर, स्पर्धा निरीक्षक रमेश म्हात्रे, मिनानाथ धानजी, पंचप्रमुख सुनील कदम, महेश घुडे नागरीक व खेळाडु मोठया संख्येने उपस्थीत होते. प्रास्ताविक रमेश जाधव यांनी केले तर मानसिंगराव पाटील यांनी आभार मानले.

ठाकरे कुटुंबाबद्दल बोलावं एवढी शंभूराज देसाई यांची योग्यता नाही ; हर्षद कदम यांची मंत्री देसाई यांच्यावर जहरी टीका

वेध माझा ऑनलाइन - मंत्री शंभूराज देसाई यांची ठाकरे कुटुंबियांवर बोलव एवढी उंची आणि योग्यता नाहीये उगीच माईक पुढे आला की काहीतरी बडबडायचं अस चालत नाही कुणाची तरी मर्जी राखायची म्हणून असली बडबड करायची याचा काही उपयोग होणार नाही असा टोला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांनी मंत्री शंभूराज देसाई याना लगावला मंत्री देसाई यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पाटण मतदार संघातून निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान दिले होते त्याला प्रत्युत्तर देताना हर्षद कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला 

ते पुढे म्हणाले आदित्य ठाकरेंवर शंभूराज देसाई यांनी बोलावं हे हास्यास्पद आहे...शंभूराजेंनी अगोदर आमच्या सारख्या शिवसैनिकांशी लढून दाखवावे मग ठाकरेंचे नाव घ्यावे...त्यांची योग्यता नाहीये ठाकरेंचे नाव घेण्याची...उगाच माईक पुढे आला की काहीतरी बडबड करायची ही त्यांची सवय आहे...याच शिवसैनिकांच्या जीवावर तुम्ही तीनवेळा आमदार झालात...2019 ला मल्हारपेठ येथे आदित्य ठाकरेंची सभा घेण्याची त्यावेळच्या निवडणुकीत तुम्हालाच गरज लागली होती आणि आता तुम्हीच त्यांना आव्हान करता ? तुमची तेवढी उंची आहे का ? असा सवालही कदम यांनी यावेळी केला...शंभूराज यांची निष्ठा काय आहे हे सर्वांना माहीत आहे...मतदार संघातील लोक आता वाटच बघतायत की कधी निवडणूक लागते... आणि त्यात शंभूराज कधी उभे राहतायत ते ...वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांना मतदार संघात घेऊन फिरायच किंवा पक्ष विरोधी भूमिका घ्यायची ही त्यांची निष्ठा सर्वांनी पाहिली आहे
त्यामुळे सध्या जिथं तुम्ही रहायचा राजकीय विचार केलाय तिथे व्यवस्थित निष्ठेने रहा... ठाकरे कुटुंबावर बोलण्याची आपली योग्यता नाहीये हे लक्षात ठेवा असेही कदम म्हणाले

Friday, February 3, 2023

पाणीप्रश्नाबाबत कराडचे माजी नगरसेवक थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला ; ..... अन्यथा कराडात जनआंदोलन उभे करणार ; दिला निवेदनातून इशारा ; या योजनेची सखोल चौकशी करण्याचीही केली मागणी ;

वेध माझा ऑनलाईन - कराडचे पाणी पेटले असल्याची परिस्थिती कराड शहरात निर्माण झाली असतानाच आज कराडच्या काही माजी नगरसेवकांनी थेट साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यानाच या संदर्भात निवेदन देत कराडची पाणीपट्टी पूर्वीप्रमाणेच लागू करा किंवा या बिलावर 30 टक्के सवलत द्या अन्यथा कराडात जनआंदोलन उभे करणार असल्याचा इशारा दिला आहे या योजनेची सखोल चौकशीही झाली पाहिजे अशी मागणीही या निवेदनातुन करण्यात आली आहे

आज कराडचे माजी नगरसेवक फारुख पटवेकर, इंद्रजित गुजर अप्पा माने संजय शिंदे तसेच त्यांचे सहकारी ऍड अमित जाधव आदीनी सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी याची भेट घेऊन त्यांना कराडच्या वाढीव पाणीपट्टी बिलाबाबत निवेदन दिले

निवेदनात म्हटले आहे की, कराडच्या वाढीव पाणीबीलाची भरमसाठ रक्कम शहर वासीयांना परवडणारी नाहीये या निर्णयामुळे लोक त्रस्त आहेत 24x7 पाणीपुरवठा योजनेसाठी म्हणून लोकांकडून 2500 रुपये पालिकेकडून घेण्यात आले मात्र सकाळी आणि सायंकाळी एक- एक तास पाणी पुरवठा नागरिकांना होत आहे बसवलेल्या या नवीन मीटर मधून येणाऱ्या हवेच्या बिलासाहित पाण्याची भरमसाठ बिले येत असल्याने नागरिकांमध्ये  मोठा रोष आहे अनेक वर्षापासून रखडलेली ही योजना अद्यापही पूर्ण झालेली नाही  इथून पुढे शहरवासीयांना पूर्वीप्रमाणेच पाण्याची बिले देण्यात यावीत किंवा 30 टक्के सरसकट सवलत नागरिकांना या बिलात मिळावी अन्यथा जनआंदोलन उभे करू असा इशारा देत या योजनेची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही या निवेदनातुन करण्यात आली आहे
दरम्यान कराड शहरात पालिकेने मीटर प्रमाणे पाणी बिल आकारणी सुरू केली आहे  यामधून बिलाची रक्कम भरमसाठ आल्याने कराडच्या लोकशाही आघाडीने पाणी बिलात नागरिकांना 20 टक्के सूट द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर शहर काँग्रेस तसेच बाळासाहेबांची शिवसेनेचे शहर अध्यक्ष राजेंद्र माने यांनी सी ओ डाके यांची भेट घेऊन 30 टक्के सवलतीची मागणी केली आहे यशवन्त विकास आघाडीने तर  50 टक्के सवलत देण्याची मागणी केली आहे आणि कराडच्या माजी नगरसेवकांनी आज थेट जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेऊन याबाबतची आपली मागणीदेखील केली आहे दरम्यान याबाबत कराडचे सी ओ डाके यांनी कालच स्पष्ट केले आहे की याबाबत आपण कोणताही निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही याविषयावरचा अंतिम निर्णय 6 फेब्रुवारीला सर्व पक्षीय नेत्यांना बोलावून त्यांच्यासमोरच घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे दरम्यान या माजी नगरसेवकांच्या भेटीनंतर जिल्हाधिकारी जयवंशी यांनी कराडचे सीओ रमाकांत डाके याना या प्रश्नाविषयी योग्य तो निर्णय घ्या अशी फोन करून तात्काळ सूचना केल्याची माहितीही या नगरसेवकांनी दिली