वेध माझा ऑनलाईन। महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाला गेल्यानंतर काँग्रेसकडून इच्छुक असलेले विशाल पाटील हे नाराज आहे. महाविकास आघाडीने पुनः एकदा सांगलीच्या जागेबाबत फेरविचार करावा आणि ही जागा काँग्रेसला सोडावी असे आवाहन विशाल पाटील यांनी केलं आहे तसेच अखेरपर्यंत सांगलीची जागा आपल्याला सुटेल आशा विशाल पाटील बाळगून आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उद्या म्हणजेच १६ एप्रिलला विशाल पाटील काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत, मात्र जर अखेरच्या दिवशीही सांगलीची जागा ठाकरे गटालाच गेली तर मात्र पुन्हा विशाल पाटील अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता आहे.
विशाल पाटील यांच्याऐवजी महाविकास आघाडीत चंद्रहार पाटलांना सांगली लोकसभेची जागा सुटल्यानंतर विशाल पाटील यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही निवडणूक लढवा अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. अखेर उद्या विशाल पाटील आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. गणपती मंदिर पासून काँग्रेस भवन पर्यंत रॅली काढून विशाल पाटील आपला उमेदवारी अर्ज भरतील. यावेळी जिल्हा काँग्रेस मधील नेतेमंडळी सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
विशाल पाटील हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. सांगली जिल्ह्यात दादा घराण्याला मानणारा मोठा गट आहे तसेच परंपरागत सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेसने लढवली आहे. मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा ठाकरे गटाला गेल्याने वादाची ठिणगी पडली. आयात विशाल पाटील यांनी जरी काँग्रेसकडून अर्ज भरला आणि त्याचा काहीही उपयोग झाला नाही तर ते पुन्हा एकदा अपक्ष अर्ज भरतील. असं झाल्यास महाविकास आघाडी आणि चंद्रहार पाटलांसाठी हा मोठा धक्का असेल.
No comments:
Post a Comment