Monday, April 15, 2024

साताऱ्यात कोण? घड्याळ की कमळ ? आज होणार मुंबईत फैसला !

वेध माझा ऑनलाईन।
सातारा लोकसभा निवडणुक २०२४ साठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला अवघे चार दिवस उरले आहेत. दरम्यान, आज महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शिंदे मोठ्या शक्ती प्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, महायुतीच्या उमेदवाराचा तिढा सुटलेला नसल्याने मतदारांबरोबरच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्यापही सातारा महायुतीमध्ये अजितदादा गटाकडे कि भाजपकडे राहणार? याबाबत शंका उपस्थित केली जात असताना महायुतीची आज मुंबईत महत्वाची बैठक पार पडणार असून यात साताऱ्याची जागा अजित पवार गट की भाजपकडे जाणार तसेच उमेदवार कोण? यावर निर्णय होणार आहे.

सातारा लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीतुन खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीवारी करून आल्यानंतर आपणच उमेदवार असणार असल्याचे सांगत प्रचारास सुरुवात देखील केली आहे. मात्र, महायुतीतील शिंदे गटाकडून पुरुषोत्तम जाधव तर भाजपकडून नरेंद्र पाटील या दोघांनी देखील उमेदवारी आपल्याला देण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अजित पवार गटानेही ही जागा आपल्यालाच मिळावी, अशी आग्रही मागणी लावून धरली आहे.


त्यांच्याकडून नितीन पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. साताऱ्यातील उमेदवारीबाबत तिढा निर्माण झाल्याने पक्षश्रेठींकडून निर्णय दिला जात नाही. महाविकास आघाडीचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी जात असून देखील अद्यापही महायुतीकडून उमेदवाराची घोषणा केली जात नसल्याने हा तिढा नेमका कसा सुटणार? याची चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दिल्लीत चार दिवस ठाण मांडल्यानंतर उदयनराजे साताऱ्यात आले. त्यावेळी त्यांच्या स्वागताचा मोठा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम झाल्यानंतर उदयनराजेंनी प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली. मतदारसंघातील बहुतांश गावांचा त्यांचा फेरा पूर्ण झाला आहे. त्यांच्याकडून उमेदवारी अर्जही नेण्यात आला आहे; परंतु आजही महायुतीच्या उमेदवारीचे कोडे सुटले नाही. महायुतीमध्ये सातारा हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ समजला जातो. तो भाजपला हवा आहे. मात्र, अजित पवार गटाकडून हा मतदार संघ देण्यास नकार दिला जात असल्याचे सूत्रांकडून सागिंतले जात आहे.


आज मुंबईतील बैठकीत साताऱ्याच्या जागेवर तोडगा निघण्याची शक्यता?
नाशिक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला देण्यासाठी भाजप तयार आहे; परंतु या मतदारसंघातून हेमंत गोडसे हे एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे शिंदे गट नाशिकची जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे महायुतीकडून अद्याप साताऱ्याच्या जागेवर तोडगा निघालेला नाही. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याला आता केवळ चार दिवस उरले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवाराला नियोजनही करावे लागणार आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी महायुतीची आज मुंबईत बैठक होणार आहे. त्यामुळे साताऱ्याच्या जागेचा तोडगा निघेल, अशी आशा आहे

No comments:

Post a Comment