उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपने धक्कातंत्र वापरत विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापलं आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम याना उमेदवारी दिली. तिकीट मिळाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेशही केला आहे. तर दुसरीकडे तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सदैव देशाच्या सेवेसाठी समर्पित असेल असं त्यांनी म्हंटल आहे
पूनम महाजन यांनी ट्विट करत म्हंटल, “खासदार म्हणून मी मागची १० वर्षे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मला दिली. त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद देते. खासदार म्हणून नाही तर मुलीप्रमाणे मला त्यांनी स्नेह दिला. मी माझ्या लोकसभा क्षेत्रातील कुटुंबीयांची, जनतेची ऋणी राहिन, तसंच आशा करते की आपलं नातं कायम टिकून राहिल. माझे दैवत, माझे दिवंगत वडील प्रमोद महाजन यांनी मला राष्ट्रप्रथम मार्ग दाखवला. तोच मार्ग मला आयुष्यभर चालवता यावा, अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सदैव देशाच्या सेवेसाठी समर्पित असेल.” या आशयाची पोस्ट पूनम महाजन यांनी केली आहे.
दरम्यान, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातुन महाविकास आघाडी तर्फे वर्ष गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड असा रंगतदार सामना मुंबईत पाहायला मिळेल. भाजपकडून तिकीट मिळताच उज्ज्वल निकम यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. माझ्यावर जी नवीन जबाबदारी देण्यात आली, ती निभावण्यासाठी बाप्पा बळ देईल. मला राजकारणाचा अनुभव नसला तरी मी नवखा नाही, अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली .
No comments:
Post a Comment