Sunday, February 1, 2026

उंब्रजच्या विकासाचा फैसला करणारी ही निवडणूक – उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे.

वेध माझा ऑनलाइन
शिवसेना आज राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. लाडकी बहीण योजना ही देशातील पहिली आणि महत्त्वाची योजना ठरली असून लाडक्या बहिणींनी भरभरून प्रेम दिले आहे. येणाऱ्या काळात रस्ते, पिण्याचे पाणी, पर्यटन आणि नागरी सुविधांसाठी शिवसेना विकासकामांना गती देईल,असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. उंब्रजच्या भविष्याचा फैसला करणारी हीच निवडणूक असल्याचे त्यांनी  सांगितले.
   कराड तालुक्यातील उंब्रज येथील बाजारपेठ तळावर शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ऑनलाईन संबोधीत केले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, सभेला सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव व्यासपीठावर उपस्थित होते.
शिवसेनेचे उमेदवार ॲड. महादेव साळुंखे, नयन निकम, सोमनाथ चव्हाण यांच्यासह पंचायत समिती गणांतील उमेदवार, हजारो शिवसैनिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले उंब्रजला नगरपंचायत दर्जा, घनकचरा व्यवस्थापन, शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, दळणवळणाच्या सुविधा आणि उड्डाणपूल या प्रश्नांना वर्षभरात न्याय देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. या सभेला प्रत्यक्ष येणार होतो; मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने मनात प्रचंड वेदना आहेत. मी सातारा जिल्ह्याचा सुपुत्र आहे. कर्मभूमी ठाणे-मुंबई असली तरी जन्मभूमी सातारा आहे. या मातीशी माझी नाळ कायम जुळलेली असून सातारा जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. छत्रपतींचा भगवा हाती असलेल्या शिवसेनेला मतदान करून जिल्हा परिषदेत भगवा फडकवा.मी गरिबी जवळून पाहिली आहे, आईची काटकसर अनुभवली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना कोणालाही बंद करता येणार नाही. शब्द द्यायचा नाही आणि दिला तर मागे घ्यायचा नाही—हीच मला बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. 

उद्योगमंत्री उदय सामंत  म्हणाले, 
ही स्व. यशवंतराव चव्हाण यांची भूमी आहे. याच भूमीचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या सन्मानासाठी देशातील पहिली लाडकी बहीण योजना आणली. त्यामुळे दर महिन्याला भाऊबीज साजरी होते. महाराष्ट्राच्या विकासात शिवसेनेचा मोठा वाटा असून विकासकामे वेगाने सुरू आहेत.
उंब्रज येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी यापूर्वी दिलेल्या ५० लाखांनंतर उर्वरित १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासनही उदय सामंत यांनी दिले. तसेच नगरपंचायत व्यापारी संकुल, घनकचरा व्यवस्थापन, पाणी प्रश्न व इतर नागरी सुविधा या सर्व प्रश्नांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून वर्षभरात पूर्णविराम मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव म्हणाले...
उंब्रज परिसरातील समस्या उद्योग मंत्र्यांसमोर मांडताना उंब्रजच्या गावाच्या वाढत्या नागरीकरणामुळे ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत बदल होणे आवश्यक आहे.याची फाईलही नगर विकास विभागाकडे प्रलंबित आहे. उंब्रज गावात घनकचर्‍याची गंभीर समस्या आहे तातडीने इथे घनकचरा निर्मुलन प्रकल्प होणे आवश्यक आहे. शिवाजीनगर व लगतच्या चार गावांमधे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तो तातडीने मार्गी लागावा. छ.शिवाजी महाराज स्मारकासाठी वाढीव निधी देण्यात यावा.उंब्रजमधील व्यापार्‍यांसाठी व्यापारी संकुल  व्हावे तसेच तासवडे औधोगिक वसाहतीत स्थानिक युवकांना नोकरीत प्राधान्य मिळावे अशा प्रकारच्या अनेक मागण्या मांडल्या.यावर उद्योगमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्यावतीने हे सर्व नागरी प्रश्न लवकरच मार्गी लागतील अशी जाहीर घोषणा केली. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे ग्रामीण भागातील महत्व अधोरेखित करताना यादव म्हणाले या माध्यमातुन केंद्र व राज्य सरकार विविध योजना व विकास तळागाळात पोहोचवत असते.ग्रामीण भागाशी नाळ असलेल्या ना.एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहुन गट व गणातील शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे अवाहन केले.
अॅड. महादेव साळुंखे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment