Thursday, August 13, 2026

कराडच्या ‘नेकलेस रोड’ प्रकल्पाचे सादरीकरण; नगरसेवकांकडून प्रश्नांची सरबती - या प्रकल्पाचे थ्री डी सादरीकरण करण्यात यावे - नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची सूचना ;

वेध माझा ऑनलाईन।
 कराड शहराभोवती प्रस्तावित करण्यात आलेल्या बहुचर्चित ‘नेकलेस रोड’ प्रकल्पाचे सादरीकरण आज गुरुवारी कराड नगरपालिकेच्या सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले. या वेळी सत्ताधारी यशवंत व लोकशाही आघाडीसह विरोधी भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. 

प्रकल्पाच्या प्राथमिक आराखड्याचे सादरीकरण करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रकल्पाची उद्दिष्टे, संभाव्य विकासकामे आणि त्यातून शहराला होणारे फायदे यांची माहिती दिली.

बैठकीस नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर, मुख्याधिकारी प्रशांत हटकर यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता देसाई यांनी व्हिडिओ चित्रफितीच्या माध्यमातून या प्रकल्पाचे सादरीकरण केले. त्यांनी प्रकल्पाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत शहराच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करताना चार प्रमुख बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण समाधीस्थळाचे सुशोभीकरण, शहरातील वाहतूक सुलभीकरण, नदीकाठाचा विकास अर्थात रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट आणि पर्यावरण संरक्षणाचा समावेश आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकल्पाची अंदाजित किंमत ६८० कोटी रुपये असून सध्या त्याचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पात जुन्या कोयना पुलापासून नवीन कृष्णा पुलापर्यंत नवीन पूल उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर नदीकाठी घाटांची उभारणी, परिसराचे सुशोभीकरण, बगीचे आणि नागरिकांसाठी विविध सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.

सादरीकरणादरम्यान नगरसेवकांनी प्रकल्पाच्या व्यवहार्यता, खर्च, पर्यावरणीय परिणाम आणि भविष्यातील नियोजनाबाबत विविध शंका उपस्थित केल्या. काही नगरसेवकांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भात अधिक माहिती देण्याची मागणी केली. त्यावर उपअभियंता देसाई यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

दरम्यान, या प्रकल्पाचे सादरीकरण सध्या प्राथमिक स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रकल्पाची अधिक सविस्तर माहिती मिळण्यासाठी अद्ययावत थ्री डी सादरीकरण करण्यात यावे,
अशी सूचना नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी केली.

No comments:

Post a Comment