Tuesday, August 11, 2026

"नेकलेस रोड'... होणारच ; आमदार अतुलबाबांचा निर्धार ;

वेध माझा ऑनलाइन।
कराड शहराच्या बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी नेकलेस रोड प्रकल्पाला आता गती मिळण्याची चिन्हे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आलेल्या या रस्त्याला जलसंपदा विभागाचे प्रिन्सिपल अप्रुअलही आम्हाला आहे त्यामुळे कराडच्या विकासात भर घालणारा हा नेकलेस रोड कोणत्याही परिस्थितीत होणारच, असा ठाम विश्वास आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केला.

कराड नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नेकलेस रोडच्या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. आरोप-प्रत्यारोपांनंतर हा विषय तहकूब ठेवण्यात आला होता. 

15 दिवसांपूर्वी हा विषय तहकूब केल्यानंतर अतुलबाबा अधिकच आक्रमक झाल्याचे दिसले 2 दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिकरित्या बोलताना हा रोड होणारच असे ठामपणे सांगितले त्यामुळे आता पुन्हा पालिकेतील शिवसेना- भाजप यांच्यामध्ये याच विषयावरून राजकारण तापणार का ?अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर आमदार भोसले यांनी या प्रकल्पाबाबत आपली भूमिका सोमवारी स्पष्ट केली

ते म्हणाले, “मला जनतेने शहर आणि परिसराच्या विकासासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे कराडसह दक्षिण विभागाचा न भूतो न भविष्यती असा विकास करणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी चोखपणे पार पाडणार आहे. नेकलेस रोड कोणत्याही परिस्थितीत होणारच.”

कराडमध्ये प्रवेश करताना नागरिकांना आणि पर्यटकांना दर्जेदार शहरात प्रवेश केल्याचा अनुभव मिळावा, अशी आपली संकल्पना असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये प्रवेश करताना ज्या पद्धतीचे उत्साही आणि आकर्षक वातावरण जाणवते, तसा ‘फील’ कराडमध्येही निर्माण करण्याचा आपला मानस आहे, असे ते म्हणाले.

शहरातील पूल, रस्ते, पाणीपुरवठा यांसह मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर भर देण्यात येणार असून, कराडला आधुनिक आणि दर्जेदार सुविधा असलेले शहर बनविण्याचे आपले नियोजन तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

स्टेडियमचे कामही लवकरच पूर्ण होणार ; 
शहरातील प्रस्तावित स्टेडियमच्या कामाबाबत बोलताना भोसले म्हणाले की, पर्यायी जागेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे काही अडचणी येत आहेत. मात्र, हा प्रश्न मार्गी लावून स्टेडियमचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

याशिवाय शहरातील प्रस्तावित बाग, विविध रस्त्यांची कामे तसेच दैत्यनिवारिणि परिसराशेजारील प्रस्तावित प्रकल्प यामुळे कराडच्या लौकिकात निश्चितच भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विकासाआड राजकारण नको’
कराडच्या विकासाच्या कामांमध्ये राजकारण आणले जाऊ नये, असे आवाहनही आमदार भोसले यांनी केले. “कराडच्या विकासासाठी उपलब्ध होणारा निधी आणि प्रस्तावित कामे मार्गी लागणे गरजेचे आहे. विकासाआड कोणतेही राजकारण होऊ नये. जनतेने मला काम करण्याची संधी दिली आहे. या संधीचे सोने करून कराडच्या विकासाचे स्वप्न पूर्णत्वाकडे नेणे हे माझे पहिले कर्तव्य आहे आणि ते मी पूर्ण करणारच,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान नेकलेस रोडसह शहरातील विविध विकासकामांबाबत आमदार भोसले यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आता कराडच्या राजकारणात पुन्हा एकदा विकासकामांचा मुद्दा केंद्रस्थानी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे

No comments:

Post a Comment