कराड शहरातील उर्दू शाळेच्या स्थलांतराचा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला असून, कचरा डेपोलगत शाळा उभारण्याच्या विषयावरून राजकीय वातावरण तापले आहे. आता काँग्रेसने या विषयात उडी घेतली असून काँग्रेस चे अल्पसंख्यांक नेते झाकीर पठाण या प्रश्नी आक्रमक झाले आहेत
काही दिवसांपूर्वीपर्यंत उर्दू शाळा जुन्या जागेवरून हलविण्यास विरोध करणारे पालिकेचे विद्यमान बांधकाम सभापती आखतर आंबेकरी आता कचरा डेपोलगत शाळा करण्यासाठी आग्रही का आहेत? त्यांच्या भूमिकेत अचानक असा बदल कसा झाला? असा थेट सवाल झाकीर पठाण यांनी उपस्थित केलाय....‘खून की नदिया बहाऍंगे... वहासे स्कुल नहीं हिलायेगे...’ असे म्हणत शाळा स्थलांतराला विरोध करणाऱ्यांची भूमिका आता नेमकी कुठे बदलली? असा सवाल करत पठाण यांनी पत्रकार परिषदेत पालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
कचरा डेपोलगत शाळा होऊ देणार नाही,
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न
कचरा डेपोलगत उर्दू शाळा उभारण्यास आपला तीव्र विरोध असल्याचे पठाण यांनी स्पष्ट केले. कचरा डेपोमुळे परिसरातील लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. भविष्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल त्यांनी केला.‘विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करून विकासाच्या नावाखाली निर्णय घेता येणार नाही. कचरा डेपोलगत शाळा होऊ देणार नाही,’ असा इशाराही पठाण यांनी दिला.
फ्लेक्सच्या मुद्द्यावरून पालिकेला घेरले
शहरातील अनधिकृत फ्लेक्सचा मुद्दाही पठाण यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. आपण सातत्याने अनधिकृत फ्लेक्सविरोधात आवाज उठविला असून, त्यामुळे नगरपरिषदेचे उत्पन्न वाढण्यास मदत होत असल्याचा दावा त्यांनी केला.
काही महिन्यांपूर्वी आपण याबाबत तक्रार केली होती. काही नगरसेवकांनीच आपले फ्लेक्स लावून त्याचे भाडे पालिकेकडे भरले नसल्याचा आरोप करत, पालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचा मुद्दा आपण उपस्थित केला होता, असे पठाण यांनी सांगितले.
‘फ्लेक्स नको’चा ठराव अन् दुसऱ्याच दिवशी बदल केला? कोणासाठी;? पठाण यांचा सवाल...
पालिकेच्या सभेतील फ्लेक्सच्या निर्णयावरही पठाण यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला. शहरात फ्लेक्स लावण्यासंदर्भात पालिकेच्या सभेत ठराव करून फ्लेक्सला आळा घालण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वाढदिवसाच्या फ्लेक्ससाठी हा ठराव बदलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
‘शहराच्या विकासासाठी घेतलेला ठराव दुसऱ्याच दिवशी बदलून वाढदिवसाचे फ्लेक्स लावण्यास परवानगी देणे, हे कसले विकासाचे राजकारण?’ असा सवाल पठाण यांनी उपस्थित केला.
या ठरावात वाढदिवसानिमित्त फ्लेक्स लावण्यास परवानगी नेमकी कोणासाठी देण्यात आली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या निर्णयानंतर... एका माजी आमदाराचा वाढदिवस पार पडला...
आणि त्यांचे बॅनर शहरात लागले होते...याकडे पत्रकार परिषदेत लक्ष वेधले गेले
प्रकाशनगरमधील बागेच्या कामावरही प्रश्नचिन्ह
प्रकाशनगर येथील एका जागेचा विषयही पठाण यांनी उपस्थित केला. संबंधित भाग पालिकेच्या मालकीचा नसताना तेथे पालिकेच्या माध्यमातून एका ठेकेदाराकडून बाग विकसित करण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. मात्र, या कामासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे का? संबंधित जागा नेमकी कोणाच्या मालकीची आहे? पालिकेने या जागेची मालकी व हद्द याची खातरजमा केली आहे का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
‘पालिकेच्या पैशातून काम होत असेल तर जागा कोणाची, परवानगी कुणाची आणि निर्णय कुणाचा?’ असा सवाल करत पठाण यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
कराड पालिकेच्या कारभारातील विविध निर्णय, ठराव आणि विकासकामांबाबत प्रश्न उपस्थित करत पठाण यांनी प्रशासनाला लक्ष्य केले. शहराच्या विकासाच्या नावाखाली निर्णय घेताना पारदर्शकता आणि नागरिकांच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे; अन्यथा प्रत्येक निर्णयाचा जाब विचारला जाईल, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
No comments:
Post a Comment