वेध माझा ऑनलाईन ।
आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी आज राज्यभर धनगर समाजाचा आक्रोश मोर्चा सुरू आहे. मुंबईतही धनगर समाजाचा मोठा मोर्चा धडकला. आमदार गोपिचंद पडळकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी पडळकर यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याची जोरदार मागणी केली. सर्वोच्च न्यायालयातून द्या नाही तर सरकारच्या अधिकारात द्या, पण आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे, असं सांगतानाच चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचं नाव द्या, अशी मागणी गोपिचंद पडळकर यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
मुंबईतील जिल्हाधिकारी कार्यालयावर हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीकरिता हा मोर्चा काढण्यात आला. आमदार गोपिचंद पडळकर यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. कोणत्या ना कोणत्या मार्गाने धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा. आरक्षणाची सोडवणूक करा. आम्ही दोन टप्प्यात लढत होतो. रस्त्यावर आणि विधानसभेत आम्ही लढत आहोत. दुसरं म्हणजे आमची न्यायालयीन लढाईही सुरू आहे. उच्च न्यायालयात आमच्याविरोधात निर्णय गेला. हायकोर्टात सरकारने आम्हाला मदत केली. पण तरीही निकाल विरोधात गेला. त्यानंतर आमचे काही लोक सुप्रीम कोर्टात गेले. तिथेही आमची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता आम्ही नव्याने मागणी केली आहे. त्यावर सरकारला आपलं म्हणणं मांडायचं आहे, अशी माहिती गोपिचंद पडळकर यांनी दिली.
No comments:
Post a Comment