Tuesday, September 8, 2026

कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन सेवा ठप्प : रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय ; आमदार अतुलबाबांनी लक्ष घालण्याची गरज ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचा आधार असलेल्या कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन सेवा गेल्या आठवडाभरापासून ठप्प असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे. शासकीय रुग्णालयात माफक दरात अथवा उपलब्धतेनुसार मिळणारी सुविधा बंद असल्याने आता रुग्णांना खासगी रुग्णालये आणि निदान केंद्रांचा रस्ता धरावा लागत आहे. मात्र, खासगी ठिकाणी सिटी स्कॅनसाठी आकारला जाणारा खर्च अनेक सर्वसामान्य कुटुंबांना परवडणारा नसल्याने आर्थिक संकटासोबतच उपचारासाठी धावपळ करण्याची वेळ रुग्णांवर आली आहे.

कराडचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. मतदारसंघातील आरोग्य सुविधांशी संबंधित प्रश्नांमध्ये लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन सिटी स्कॅन मशीनची सद्यस्थिती जाणून घ्यावी आणि संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून सेवा तातडीने पूर्ववत करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान 
कराडचे उपजिल्हा रुग्णालय हे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे शासकीय आरोग्य केंद्र आहे. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने रुग्ण येथे उपचारासाठी येतात. अपघातग्रस्त, डोक्याला दुखापत झालेले रुग्ण, अचानक प्रकृती खालावलेले रुग्ण तसेच विविध गंभीर आजारांच्या निदानासाठी डॉक्टरांकडून सिटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत रुग्णालयातीलच सिटी स्कॅन सेवा बंद असणे ही केवळ तांत्रिक अडचण नसून थेट रुग्णांच्या उपचाराशी संबंधित गंभीर बाब आहे त्यामुळे या व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते.रुग्ण आजारी आहे, त्याला निदानाची गरज आहे; मात्र ही व्यवस्था बंद असल्याने रुग्णाने उपचारासाठी खासगी रुग्णालयात जावे आणि हजारो रुपयांचा खर्च करावा, ही परिस्थिती कितपत योग्य आहे?

शासकीय रुग्णालयात सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी सिटी स्कॅन केंद्रांकडे पाठविले जाते. तेथे तपासणीसाठी होणारा खर्च अनेक कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा भार टाकणारा ठरतो.
विशेषतः गरीब, शेतकरी, मजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांसाठी अचानक आलेला वैद्यकीय खर्च पेलणे कठीण असते. गंभीर आजार किंवा अपघाताच्या परिस्थितीत आधीच औषधोपचाराचा खर्च सुरू असताना त्यात महागडी निदान चाचणी जोडली गेल्यास कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटण्याची शक्यता असते.म्हणूनच शासकीय रुग्णालयातील सिटी स्कॅन सेवा ही केवळ एक सुविधा नसून गरजू रुग्णांसाठी जीवनावश्यक आधारव्यवस्था आहे.

मग,आरोग्य विभाग नेमका काय करत आहे?
एकीकडे शासनाकडून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा देण्याचा दावा केला जातो. दुसरीकडे कराडसारख्या महत्त्वाच्या शहरातील उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक तपासणीची सुविधा बंद राहते, ही विरोधाभासी परिस्थिती आहे.
या व्यवस्थेत काही प्रॉब्लेम झाला असेल तर तात्पुरती पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही? रुग्णांना जवळच्या शासकीय रुग्णालयात सिटी स्कॅनची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने कोणती यंत्रणा उभी केली आहे? याबाबतही स्पष्टता आवश्यक आहे.
रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य विभागाने केवळ  ही "सुविधा बंद आहे’ एवढी माहिती देऊन हात झटकण्याऐवजी सेवा पूर्ववत करण्यासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करण्याची गरज आहे.

आरोग्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालावे
कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन सेवा तातडीने सुरू करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
आरोग्यमंत्री यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने अहवाल मागवावा, मशीन दुरुस्तीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी आणि तोपर्यंत रुग्णांसाठी पर्यायी सिटी स्कॅनची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आमदार अतुल भोसले 
यांनी पुढाकार घेण्याची गरज
या गंभीर प्रश्नाकडे अतुलबाबांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. मतदारसंघातील आरोग्य सुविधांशी संबंधित प्रश्नांमध्ये लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन सिटी स्कॅन सेवा का बंद आहे? याबाबत सद्यस्थिती जाणून घ्यावी आणि संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून सेवा तातडीने पूर्ववत करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


No comments:

Post a Comment