कराड शहरासह तालुक्यातील तसेच लगतच्या ग्रामीण व डोंगरी भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र असलेल्या स्व. सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची तातडीने दुरुस्ती व नूतनीकरणासाठी शासनाने ४.५० कोटींचा निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आज मुंबई येथे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
कराड येथील स्व. सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, या रुग्णालयाची मुख्य इमारत तसेच आवारातील इतर इमारती जुन्या झाल्या असून, त्यांची मोठ्या प्रमाणात पडझड व झीज झाली आहे. इमारतीच्या दुरवस्थेमुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती होते. तसेच भिंतींना तडे गेले असून, जुने झालेले विद्युत व प्लंबिंगचे जाळे आणि स्वच्छतागृहांची झालेली दुरवस्था यामुळे रुग्ण, डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अशावेळी या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट, तातडीची दुरुस्ती, वॉटरप्रूफिंग, सिव्हिल व इलेक्ट्रिकल नूतनीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. या सर्व कामांसाठी शासनाकडून ४.५० कोटींचा निधी तातडीने मंजूर करून उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार डॉ. भोसले यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली. तसेच रुग्णालयाच्या इमारतीची सुरक्षितता आणि तेथील आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी या कामांना प्राधान्य देण्याची मागणीही त्यांनी केली.
यावेळी आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी कराड उपजिल्हा रुग्णालयाच्या दुरुस्ती व नूतनीकरणाच्या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन, आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांना दिली.
अतुलबाबा भोसले यांची प्रतिक्रिया ;
कराड येथील स्व. सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयावर कराड शहरासह ग्रामीण आणि डोंगरी भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. त्यामुळे या रुग्णालय इमारतीच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी निधी मिळावा, याबाबत आरोग्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली. लवकरच हा प्रश्न मार्गी लागून रुग्णांना अधिक सुरक्षित व चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
No comments:
Post a Comment