शिक्षकाची भूमिका केवळ माहिती देण्यापुरती मर्यादित नाही; तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करुन, त्यांना प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करावे. तसेच त्यांच्यात सामाजिक परिणामांची जाणीव निर्माण करावी. शिक्षकाने केवळ माहिती देणारा ‘शिक्षक’ न राहता ‘गुरु’ होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन कृष्णा विश्व विद्यापीठाचे सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले. कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या संयोजनाखाली कृष्णा विश्व विद्यापीठात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, फार्मसी विभागाचे अधिष्ठाता डॉ. एन. आर. जाधव, फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजुलु, नर्सिंग विज्ञानच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, दंतविज्ञानचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन. डी. आणि अलाईड सायन्सचे अधिष्ठाता डॉ. गिरीश पठाडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. मिश्रा पुढे म्हणाले, की शिक्षक दिन हा केवळ औपचारिक उत्सव नसून, शिक्षकांनी स्वतःच्या भूमिकेचे आत्मपरीक्षण करून, ज्ञानदात्यापासून आदर्श गुरु होण्याच्या दिशेने वाटचाल करण्याचा दिवस आहे. ‘शिक्षकापासून गुरु’ हा प्रवास आत्मपरीक्षणातून घडतो. विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला आणि प्रश्न विचारण्याच्या अधिकाराला शिक्षण व्यवस्थेत महत्त्व देण्याची गरज आहे. शिक्षणातून धैर्य, धैर्यातून दृढविश्वास आणि दृढविश्वासातून चारित्र्य निर्माण झाले तरच सक्षम राष्ट्रनिर्मिती शक्य आहे.
विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा व्हिडिओ संदेशाद्वारे शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देताना म्हणाल्या, की शिक्षकांनी ज्ञान देण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्यनिर्मिती, व्यक्तिमत्त्व विकास आणि राष्ट्रनिर्मितीची भावना रुजवावी.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एम. व्ही. घोरपडे यांनी शिक्षक दिनानिमित्त आपल्या शिक्षकांच्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांकडून केवळ विषयाचे ज्ञानच नव्हे, तर संयम, शिस्त, समस्यांवर मात करण्याची क्षमता आणि अपयशाने खचून न जाण्याची वृत्ती शिकायला मिळते. कृत्रिम बुद्धिमत्ता, कौशल्य प्रयोगशाळा यांसारख्या आधुनिक साधनांचा वापर वाढला असला तरी शिक्षकाचे मार्गदर्शन आणि सहकार्य यांची जागा घेता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विद्यापीठाचे उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. नवनाथ जाधव, आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाच्या उपसंचालिका अर्चना कौलगेकर, डॉ. डी. के. अगरवाल यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment