छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन केले. यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या हाताळणीवरून सरकारला मिस्कील टोला लगावला, तर तारळे येथील अदानी प्रकल्प, सातारा जिल्हा बँकेचे राजकारण आणि महायुतीतील नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांवरही भाष्य केले.दरम्यान, सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर महायुतीतील नेत्यांमध्ये सुरू असलेल्या अघोरी बाबांकडून आणलेल्या आणलेल्या औषधाच्या मुद्यावरून रंगलेल्या मंत्री गोरे व शंभूराज देसाई यांच्या एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांवर भाष्य करताना उदयनराजे म्हणाले, “मी माणुसकीचा धर्म पाळणारा आहे, अघोरीला मानणारा नाही.” त्यांच्या या वक्तव्यातून त्यांनी महायुतीतील या दोन्ही नेत्यांचे अप्रत्यक्षपणे कान टोचले आहेत!
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन केल्यानंतर उदयनराजे म्हणाले, “महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांना आज अभिवादन करण्यासाठी आलो आहे. यशवंत विचारांनी आम्ही सर्व सहकारी पुढे जात आहोत.”
विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सरकारला टोला लगावताना उदयनराजे यांनी, आंदोलन ज्या पद्धतीने हाताळले गेले, त्यामुळे मलाच दौरे पाडण्याची वेळ आली, असा मिस्कील टोला लगावला.
तारळे येथील अदानी प्रकल्पाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “मी अदानी प्रकल्पाचा प्रवक्ता नाही. मात्र ऊर्जा निर्मिती गरजेची आहे. पर्यावरणाचे रक्षण करताना जितकी झाडे तोडली जातील, तितकी झाडे लावणेही गरजेचे आहे.”
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष पाटील यांच्या अभिनंदनावेळीही उदयनराजे यांनी आपल्या खास शैलीत टिप्पणी केली. “शालीआड मी त्यांना एवढेच म्हणालो की, सध्या मी बँकेचा चेअरमन नसलो तरी मला भत्ता मिळाला पाहिजे,” असे त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
No comments:
Post a Comment