Tuesday, October 26, 2021

राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये मी का नाही...?उदयनराजेंचा सवाल :पवार साहेबांना विचारा ; शिवेंद्रराजेंचे उत्तर...

वेध माझा ऑनलाइन
सातारा
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक अगदी काही दिवसांवर आलीय. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपलीय. पण प्रथेपरंपरेप्रमाणे साताऱ्यातल्या दोन्ही राजेंमध्ये सुंदोपसुंदी सुरुच आहे. राष्ट्रवादीप्रणित सर्वसमावेशक पॅनेलमध्ये मी का नाही?, असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी विचारला होता. त्यावर हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा पवारसाहेबांना विचारा, असं म्हणत उदयनराजेंचा बॉल पुन्हा त्यांच्याच कोर्टात शिवेंद्रराजेंनी ढकललाय.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत खा. उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीप्रणित सर्वसमावेशक पॅनलमध्ये अद्याप तरी जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांनी दबाव तंत्राचा वापर करत बँकेचे चेअरमन शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे संचालक मंडळ यांना खिंडीत पकडायला सुरुवात केली आहे.
उदयनराजेंना पॅनल मध्ये का घेतले नाही या विषयी त्यांनी रामराजे, शरद पवार, अजित पवार यांच्याशी बोलून घ्यावे. साताऱ्यात जे काय होतंय ते सर्व उदयनराजेंमुळे होत असल्याचा टोमणा मारत सातारला ऑक्‍सिजनचा पुरवठा देवाकडून बंद होणार होता मात्र तो सुद्धा उदयनराजेंनी सुरु केला, अशा शब्दात शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंची नक्कल केली. 
शिवेंद्रराजे अध्यक्ष असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने जरंडेश्वर कारखान्याला कर्ज कसे दिले?, असा सवाल उपस्थित करत मी बँकेत जागा अडविण्यासाठी संचालक झालो नाही तर शेतकऱ्यांच्या हिताची देखरेख करण्याकरिता बँकेत मला पाठवले असल्याचे उदयनराजे म्हणाले. यावेळी गुरु कमोडीटीचा गुरु कोण? असा सवाल उपस्थित करून त्यांनी अजित पवारांवर त्यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे.यावर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना प्रत्युत्तर देत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी लागली नाही, असं सांगत उदयनराजेंना माहित नसावे ED ने जी माहिती मागवली ती जरंडेश्वर कारखान्यांना दिलेल्या फायनान्स बाबत होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेने जरंडेश्वर ची सर्व कागदपत्रे तपासून हे कर्ज दिले असून सध्या जरंडेश्वरचे सर्व हप्ते नियमित सुरु असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान उदयनराजे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर केलेल्या आरोपावर मला माहिती नाही, असे सांगून मागील काही दिवसांपूर्वी जिल्हा बँकेची बैठक पार पडली. त्यामध्ये उदयनराजे ‘बँक चांगली चालली आहे’, असं म्हणाले होते, मग आता माशी कुठे शिंकली?, असा सवाल शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना विचारला.

No comments:

Post a Comment