Wednesday, October 27, 2021

वानखेडे प्रकरणी नवाब मलिकांची अर्ध्या तासाची खळबळजनक पत्रकार परिषद...

वेध माझा ऑनलाइन
ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. सकाळी 9 वाजता वानखेडे यांच्या लग्नाचा फोटो ट्विट करुन पुढच्या तासाभरात त्यांनी 30 मिनिटांची घणाघाती पत्रकार परिषद घेतली. या प्रेसमध्ये त्यांनी आज पुन्हा नवे आरोप केले आहेत. आर्यन खान ड्रग्ज केस कशी फ्रॉड आहे हे समजण्यासाठी 3 व्यक्तींचे CDR तपासा, सगळा कार्यक्रम जगजाहीर होईल. क्रूझवर रेड झालीच नाही, त्याअगोदर कारवाई झाली, हे सगळ्यांसमोर येईल, असं नवाब मलिक म्हणाले. तसंच क्रूझवरच्या पार्टीत समीर वानखेडे यांचा दाढीवाला मित्र होता. त्यांनी त्याचं नाव जाहीर करावं, त्यांनी मित्राचं नाव जाहीर केलं नाही तर मी जाहीर करेन, असं मलिक म्हणाले.

समीर वानखेडे, वानखेडेंचे चालक आणि प्रभाकर साईल यांचा सीडीआर तपासावा. त्यांच्या सीडीआरमधून सगळा घटनाक्रम समोर येईल, अशी मागणी नवाब मलिक एनसीबीकडे केली. झालेले आरोप गंभीर आहे. एनसीबीने आता तत्काळ पावलं उचलावीत, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. प्रभाकरने व्हिडीओद्वारे सगळा घटनाक्रम समोर आणलाय. या प्रकरणाच्या खोलात जाण्याची गरज आहे. विशेष म्हणजे क्रूझ पार्टीची महाराष्ट्र पोलिसांकडून परवानगी घेतलेली नव्हती, असंही नवाब मलिक म्हणाले.

क्रूझवरच्या ड्रग्ज पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाचा सहभाग होता. हा तोच दाढीवाला आहे, जो समीर वानखेडेंचा मित्र आहे, असा धक्कादायक आरोप नवाब मलिक यांनी केला. क्रूझवरील पार्टीचं सीसीटीव्ही फुटेज मागवावं. त्याची प्रेमिका बंदूकीसह क्रूझवर होती. एका व्हिडीओत ती डान्स करताना दिसून येत आहे. क्रूझवरील पार्टीचं सीसीटीव्ही समोर आणा, सगळं सत्य समोर येईल असं ते म्हणाले.

समीर वानखेडेंची नोकरी नक्की जाणार

माझा लढा हा धर्माविरोधात नाही तर त्यांनी कशा चुकीच्या पद्धतीने नोकरी मिळवलीय, हे मला सगळ्यांसमोर आणायचंय. खोटा जातीचा दाखला घेऊन त्यांनी पद्धतीने नोकरी मिळवली, हा माझा स्पष्ट आरोप आहे. एक दलित व्यक्ती झोपडीत राहून युपीएससीची तयारी करत होता. त्याची नोकरी समीर वानखेडेने हिसकावून घेतली आहे. त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायला हवी. अशा बोगसगिरीविरोधात 3 ते 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, मला विश्वास आहे की त्यांची नोकरी नक्की जाईल.

तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन, मलिकांचा पुनरुच्चार

जर एका समीरला असा फर्जीवाडा करुन नोकरी मिळत असेल तर 15 कोटी मुस्लिमांना मागासवर्गीय म्हणून अशी नोकरी मिळेल का?, असा सवालही नवाब मलिक यांनी यावेळी विचारला. मी दाखवलेला जातीचा आणि जन्माचा दाखला जर खोटा असेल तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असा पुनरुच्चार मलिक यांनी करताना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने याची चौकशी करावी, अशी मागणीही मलिक यांनी केली.मला काल एनसीबीच्या अधिकाऱ्याच्या निनावी पत्र मिळालं, पहिल्यांदा म्हटले याची दखल घेऊ, नंतर मी हे पत्र एनसीबी डीजींना पत्र पाठवलं. आरोपांकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे, कारण आरोप खूपच गंभीर आहेत. मला वाटतं एवढी मोठी इनव्हिस्टिगेश एजन्सी आहे, आमच्यापुढेही जाऊन चार पावलं काम करेल, अशी अपेक्षा होती, असं नवाब मलिक म्हणाले. निनावी पत्राची दखल घ्यायलाच हवी, ज्या विषयावरुन मी आरोप करतोय, त्याकडेही एनसीबीने दुर्लक्ष करु नये, असं नवाब मलिक म्हणाले

No comments:

Post a Comment