महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील निधनाची बातमी अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. या अपघातात त्यांचे असे अकाली जाणे हे केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशाचे मोठे नुकसान आहे. अजितदादा हे अत्यंत शिस्तप्रिय व धडाडीचे लोकनेते होते
पवार कुटुंबीयांप्रती मी माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजितदादांना श्रद्धांजली वाहिली
ते म्हणाले...
अजित पवार हे अत्यंत शिस्तप्रिय आणि कार्यक्षम नेते होते. इतका शिस्तबद्ध नेता क्वचितच पाहायला मिळतो. २०१० साली मी मुख्यमंत्री म्हणून प्रशासनाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. जवळपास चार वर्षे आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्राचे नेतृत्व केले आणि जनहिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. आमच्यात काही मतभेदही झाले. एका टप्प्यावर ते नाराज होऊन आपल्या पदाचा राजीनामा देऊन बाहेर गेले होते. मात्र, मी त्यांना समजावून पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले. त्या काळातही त्यांच्याकडे वित्त विभागाची जबाबदारी होती आणि आजही तीच जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करण्यात अत्यंत कुशल होते.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, कृषी क्षेत्र आणि सहकार क्षेत्र यांची त्यांना सखोल जाण होती. राज्याचे नेतृत्व करण्याची त्यांच्यात अपार क्षमता होती.
आज त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्याला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि देशाच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. पवार कुटुंबीयांप्रती मी माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो
No comments:
Post a Comment