कराड
वनवासमाची (खोडशी) आणि आगाशिवनगर (मलकापूर) येथील दोघांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळेच कराड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ८ झाली असून सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या १६ इतकी झाली आहे.
जिल्ह्यातील तीन कोरोनाग्रस्त रूग्ण यापूर्वीच बरे होऊन रूग्णालयातून घरी गेले आहेत. याशिवाय दोन कोरोनाग्रस्त रूग्णांचा उपचारावेळी मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मागील सहा दिवसांत जिल्ह्यातील एकट्या कराड तालुक्यात ६ नवे कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी बाबरमाची परिसरातील रूग्णास कोरोनाची बाधा झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले होते. या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना प्रशासनाने क्वारंटाईन करून त्यांची तपासणी केली होती. या लोकांपैकी वनवासमाची (खोडशी) आणि आगाशिवनगर (मलकापूर) येथील दोघांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
संपूर्ण सातारा जिल्ह्यात १६ कोरोनाबाधित रूग्ण आजवर सापडले आहेत. त्यापैकी एकट्या कराड तालुक्यात ८ जण आढळून आल्याने कराडकरांची चिंता वाढली असून आता प्रशासनाने कठोर उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे.
No comments:
Post a Comment