Monday, April 20, 2020

साताऱ्यात लॉक डाऊन राहणार जैसे थे, मात्र मिळणार काहीसा दिलासा...



सातारा
लॉकडाऊन जैसे थे ठेवताना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील जनतेला थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तर शहरी व ग्रामीण भागातील बांधकामे काही अटी शर्तीवर सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. जिल्ह्यात जमावबंदी आदेश पुढेही चालू राहणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन जैसे थे राहणार असून नागरीकांना घराबाहेर पडता येणार नाही.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन सुरूच ठेवताना जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रातील सर्व कंपन्या काही अटीशर्तींवर सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. पण कंपनी सुरू करताना ऑनलाइन परवानगी घेण्यासोबतच यासाठी नियुक्त तालुक्‍यातील अधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच कंपनी सुरू करता येणार आहे. तसेच लॉकडाऊन संपेपर्यंत कंपनीतील कामगारांना घरी सोडता येणार नाही, त्यांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था कंपनीच्या आवारातच करावी लागणार आहे. या अटीशर्तीचे पालन न केल्यास सदर कंपनीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातंर्गत उत्पादन, विक्री व जीएसटी परवाना रद्द केला जाणार आहे. तसेच केवळ जिल्ह्यातील कामगारांनाच कंपनीत कामावर येता येणार आहे.


कोरोनाचा संसर्ग सुरू असला तरी जिल्ह्यातील उद्योगाचे थांबलेले अर्थचक्र सुरू राहण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज काही अटीशर्तींवर केवळ ग्रामीण भागातील उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सध्या जिल्ह्यातील सात औद्योगिक वसाहतींसह विशेष आर्थिक क्षेत्रातील 150 उद्योग जे अत्यावश्‍यक वस्तूंची निर्मिती करतात. तेवढेच उद्योग सुरू आहेत. मात्र, उर्वरित उद्योग बंद राहिल्याने कामगारांचा पगार, विज, पाणी व इतर बिलांसह जीएसटी व घेतलेल्या कर्जाचे व्याज व हप्ते भरणे अवघड झाले आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला मंदीचा फटका सहन करावा लागणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी औद्योगिक अर्थचक्र सुरू राहण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पण त्यासाठी विविध दहा प्रकारच्या अटी व शर्ती लादल्या आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक कंपन्या सुरू करणार का, असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे. या अटी शर्तींमध्ये उद्योग सुरू करताना त्यांना एमआयडीसीच्या वेबसाईटवर कंपनीची सर्व माहिती ऑनलाईन भरून स्वयंघोषणापत्र द्यावे लागणार आहे. ही माहिती चुकीची किंवा दिशाभूल करणारी भरल्यास संबंधित कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. तसेच त्या त्या ठिकाणचे प्रांताधिकारी उद्योग सुरू करण्याबाबची परवानगी दिली जाणार आहे. तसेच ती नाकारण्याचा ही अधिकार असेल. कंपनी सुरू करताना ऑनलाइन माहिती भरल्यानुसार कामगारांची यादीही अंतिम करावी लागेल. कामगारांची एकदाच वाहतूक करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. सर्व कामगारांना कंपनीच्या वाहनातून कार्यस्थळी घेऊन गेल्यानंतर लॉकडाऊन संपेपर्यंत कंपनीतून घरी सोडता येणार नाही. कर्मचारी व कामगारांची राहण्याची, जेवण्याची सोय कंपनीच्या आवारातच करावी लागणार आहे. कंपनीत जिल्ह्यातीलच कामगार कामावर येऊ शकणार आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील कर्मचारी व कामगारांना परवानगी मिळणार नाही.

कंपनीच्या मॅनेजमेंट स्टाफला केवळ कंपनीच्या बसमधून प्रवास करता येईल. तसेच त्यांना वेगळा वाहतूक परवाना घेता येईल. मात्र, त्यासाठी स्वतंत्र वाहतूक यंत्रणा कंपनीला उभी करावी लागेल. वैयक्तिक वाहनाने कोणत्याही सबबीवर मॅनेजमेंट स्टाफच्या व्यक्तीला प्रवास करता येणार नाही. कंपनीन कोणी कोराना बाधित सापडल्यास कंपनी तातडीने बंद करण्याचा अधिकार आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहणार आहे.

No comments:

Post a Comment