गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरातील गणपती विसर्जन मार्ग आणि प्रीतीसंगम घाट परिसरात भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता प्रकाशव्यवस्था आणि सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. युवा नेते ओमकार मुळे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत परिसराची पाहणी करून विसर्जन मार्गावरील प्रकाशव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी अमोल पवार , अब्राम मुजावर यांची उपस्थिती होती
या पाहणीस लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचे मार्गदर्शन लाभले. गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रीतीसंगम घाट परिसरात हजारो भाविकांची गर्दी होते. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्जन मार्गावर कुठेही अंधाराचे ठिकाण राहू नये, तसेच आवश्यक त्या सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, अशा स्पष्ट सूचना नगराध्यक्ष यादव यांनी दिल्या.
बंद पथदिव्यांचा मुद्दा महत्वाचा
नगराध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार ओमकार मुळे यांनी विसर्जन मार्ग, प्रीतीसंगम घाट तसेच भाविकांच्या ये-जा करण्याच्या मार्गांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी काही ठिकाणी बंद असलेले पथदिवे तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यकता निदर्शनास आणून देण्यात आली.
गर्दीच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार अतिरिक्त लाईटची व्यवस्था करणे, घाट परिसरात पुरेसा प्रकाश उपलब्ध राहील याची दक्षता घेणे, तसेच संपूर्ण विसर्जन मार्गावर प्रकाशव्यवस्था अखंडित ठेवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.
दरम्यान गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रीतीसंगम घाटाकडे मोठ्या संख्येने नागरिक आणि भाविक येतात. विशेषतः रात्रीच्या वेळी गर्दी वाढत असल्याने प्रकाशव्यवस्था हा केवळ सुविधेचा विषय नसून भाविकांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित प्रश्न आहे.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेश मंडळांचे कार्यकर्ते, महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच हजारो भाविकांची उपस्थिती असते. त्यामुळे मार्गावरील अंधाराचे ठिकाण, बंद पथदिवे किंवा अपुरी प्रकाशव्यवस्था यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने दक्ष राहणे गरजेचे असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
“गणेशोत्सव उत्साहात, विसर्जन सुरक्षित वातावरणात व्हावे”
“गणेशोत्सव हा कराडकरांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा सण आहे. विसर्जनाच्या वेळी भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. विशेषतः प्रकाशव्यवस्था सुरळीत ठेवून अंधाराची ठिकाणे दूर करण्यास प्राधान्य दिले जाईल,” अशी भूमिका पाहणीदरम्यान मांडण्यात आली.दरम्यान, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विसर्जन मार्ग तसेच प्रीतीसंगम परिसरातील आवश्यक दुरुस्तीची कामे आणि प्रकाशव्यवस्थेची उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
No comments:
Post a Comment