बीपीसीएलच्या गॅस पाइपलाइनचे काम अनेक दिवसांपासून रखडले होते मात्र याच पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक १३ व १४ मध्ये बीपीसीएल पाइपलाइन जाणाऱ्या मार्गाची नुकतीच मोजणी करण्यात आली असून, पाइपलाइनचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासन व बीपीसीएल अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली.
मलकापूर हद्दीपासून बैल बाजार रोडमार्गे शंभूतीर्थ चौकापर्यंत जाणारी प्रमुख पाइपलाइन तसेच कोल्हापूर नाका येथील ‘आय लव्ह कराड’ परिसरातून सुरू होणारी पाइपलाइन—पोपटभाई पंप, पटेल पेट्रोल पंपमार्गे शंभूतीर्थ चौक आणि पुढे ईदगाह मार्गे छत्रपती शिवाजी स्टेडियमपर्यंत जाणाऱ्या मार्गाची पाहणी व मोजणी करण्यात आली आहे.
तसेच बीपीसीएलला आवश्यक वर्क ऑर्डर देण्याबाबत नगरपालिका प्रशासन व संबंधित बीपीसीएल अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली असून, त्यामुळे पाइपलाइनचे रखडलेले काम लवकर सुरू होण्याची शक्यता आहे.
एचडीडी की ओपन कट?
वाहतुकीचा प्रश्न महत्त्वाचा
पाइपलाइनचे काम करताना एचडीडी तंत्रज्ञानाचा वापर करायचा की ओपन कट पद्धतीने काम करायचे, यासह कामासाठी लागणारा कालावधी, वापरण्यात येणारे साहित्य आणि कामाची कार्यपद्धती याबाबतही चर्चा करण्यात आली. कामाच्या काळात वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच नागरिकांना कमीत कमी त्रास सहन करावा लागेल, याची दक्षता घेण्याची मागणी करण्यात आली.
पाइपलाइनचे काम वेळेत आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करून त्यानंतर रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावीत, यावरही बैठकीत विशेष भर देण्यात आला.
बैल बाजार रोडला मिळणार दिलासा
बीपीसीएल पाइपलाइनच्या कामामुळे विशेषतः बैल बाजार रोडचे रस्त्याचे काम रखडलेले आहे. पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रस्त्याच्या अवस्थेमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
यावेळी नगरसेवक शिवाजी पवार,आशुतोष डुबल , सचिन वास्के, रोहन विभुते तसेच नगरपालिकेचे अधिकारी व बीपीसीएलचे अधिकारी उपस्थित होते
No comments:
Post a Comment