केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता थेट साखर कारखान्यांना लक्ष्य केले आहे. राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन स्थगित केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांवर धडक देत आंदोलनाची धार तीव्र केली. वजनकाट्यांवर धडक देत ‘काटा बंद’ आंदोलनाचा इशारा दिल्याने पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात खळबळ उडाली आहे.
येडेमच्छिंद्र येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून राजू शेट्टी यांनी आंदोलनाची सुरुवात केली. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह त्यांनी सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांवर धडक दिली. कराडचा कृष्णा, कुंडलची क्रांती, वांगीचा सोनहिरा, वाळव्याचा हुतात्मा आणि चिखलीचा विश्वास या कारखान्यांच्या परिसरात आंदोलन करण्यात आले.
साखरेचा किमान विक्रीभाव अर्थात हमीभाव केंद्र सरकारने वाढविल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासने नकोत, तर ठोस निर्णय हवा, अशी भूमिका घेत त्यांनी साखर उद्योग आणि केंद्र सरकारला थेट आव्हान दिले.
आंदोलनादरम्यान कारखानदार आणि प्रशासनाला इशारा देताना शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आरपारच्या लढाईची भूमिका स्पष्ट केली. चालू वर्षी शेतकरी केंद्र सरकारच्या अन्यायी धोरणांविरोधात रस्त्यावर उतरला असून, या संघर्षात साखरेचा हमीभाव वाढविणे केवळ शेतकऱ्यांच्याच नव्हे, तर साखर कारखानदारांच्याही हिताचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
‘काटा बंद’ आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे साखर कारखान्यांच्या आगामी हंगामाबाबत चर्चेला वेग आला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकार काय निर्णय घेणार आणि साखर कारखानदार या आंदोलनाबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे आता पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे साखर उद्योगातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
No comments:
Post a Comment