Friday, November 27, 2026

कराडात संविधान दिनानिमित्त लोकशाही आघाडीकडून बाबासाहेबांना अभिवादन; विद्यार्थ्यांना गणवेश वाटप ;

वेध माझा ऑनलाइन।
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत संविधान दिनानिमित्त कराडमध्ये लोकशाही आघाडीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अंगणवाडी क्रमांक १७ मधील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. संविधानातील समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय या मूलभूत मूल्यांशी एकनिष्ठ राहण्याची शपथही उपस्थितांनी घेतली.

संविधान दिनानिमित्त लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत काका पाटील, माजी गटनेते सौरभ अशोकराव पाटील यांच्यासह आघाडीच्या नगरसेवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, स्वातंत्र्य, न्याय आणि प्रतिष्ठेचा अधिकार दिला असून, संविधानातील मूल्यांचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी उपक्रमातून देण्यात आला.

यानंतर अंगणवाडी क्रमांक १७ येथे लोकशाही आघाडीचे सहकारी नगरसेवक राहुल भोसले यांच्या वतीने विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. बालवयात शिक्षण, समानता आणि सामाजिक जाणीव यांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला. गणवेश वाटपानंतर उपस्थितांनी संविधानातील समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय या मूल्यांशी निष्ठा राखण्याची शपथ घेतली.
यावेळी लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत काका पाटील, माजी गटनेते सौरभ अशोकराव पाटील, नगरसेवक राहुल भोसले, राकेश शहा, मंगेश वास्के, प्रमोद तोडकर,रवींद्र मुंडेकर, सतीश भोंगाळे विद्या लादे, अंगणवाडी सेविका मुजावर चाची, सारिका लादे, रेशमा लादे, भारती लादे, ज्योती शोखल, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय दुपटे, सुदेश थोरवडे, सुमित कांबळे, ओंकार कांबळे, हर्षल सरगडे, गणेश पाटील तसेच पालक उपस्थित होते.


No comments:

Post a Comment