संविधानाने दिलेले न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचे मूल्य केवळ भाषणापुरते मर्यादित न ठेवता प्रत्येकाने आपल्या आचरणात उतरवणे गरजेचे आहे. महिलांना विविध क्षेत्रांत मिळणारा सन्मान, शिक्षणाच्या संधी आणि प्रगतीचा मार्ग संविधानाने दिलेल्या अधिकारांमुळे अधिक व्यापक झाला आहे. शिक्षण, सामाजिक समता आणि संविधानिक अधिकारांची जाणीव समाजात रुजवणे आवश्यक असून,पोलिसांकडून कोणावरही अन्याय होणार नाही; नागरिकांनीही आपल्या मूलभूत कर्तव्यांचे पालन करावे, असे आवाहन कराडच्या डीवायएसपी राजश्री पाटील यांनी केले.
कराड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात समता सामाजिक विकास संस्थेच्या वतीने संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अॅड. संभाजीराव मोहिते, कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, मलकापूर नगरपालिकेचे नगरसेवक दादासो शिंगण, कराड नगरपालिकेचे माजी नगरसेवक फारूक पटवेकर, मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तोडकर, ॲड. मयूर माने आदी मान्यवर उपस्थित होते.
अॅड. संभाजीराव मोहिते यांनी संविधानातील मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करताना, संविधान केवळ वाचून किंवा त्यावर भाष्य करून उपयोग नाही, तर त्यातील विचार प्रत्यक्ष आचरणात आणणे गरजेचे असल्याचे सांगितले. भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाने अधिकारांसोबत कर्तव्यांचीही जाणीव ठेवली पाहिजे. संविधानाने देशातील अनेक सामाजिक प्रश्नांना दिशा दिली असून, त्याचा खऱ्या अर्थाने अंगीकार करण्याचे व्रत प्रत्येकाने स्वीकारावे, असे आवाहन त्यांनी केले.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी सातारा जिल्हा पोलीस दल संविधानातील मूल्यांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस जवानांना संविधान दिनी अभिवादन करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
संस्थेचे अध्यक्ष आनंदराव लादे यांनी प्रास्ताविकात संविधान दिनाचे महत्त्व विशद केले. कराडमधील समतावादी नागरिकांना एकत्र आणून दरवर्षी संविधान दिनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. संविधानातील मूल्यांची समाजाला जाणीव व्हावी आणि सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी, हा उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्य मिळाले असले, तरी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळण्याची गरज आजही कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संविधान दिनानिमित्त आपली मनोगते व्यक्त केली. स्नेहा थोरात, दक्ष माने आणि पलक घोरपडे यांनी विचार मांडले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर संविधानाच्या प्रतीचे सामूहिक वाचन करण्यात आले. कन्या प्रशाळा, उर्दू हायस्कूल आणि टिळक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. सहभागी शाळांना प्रमाणपत्रे देण्यात आली, तर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
चौकाचे ‘संविधान चौक’ नामकरण
दरम्यान, समता सामाजिक विकास संस्थेच्या पुढाकाराने कराड येथील सौ. वेणूताई चव्हाण शासकीय उपजिल्हा रुग्णालय चौकाचे ‘संविधान चौक’ असे नामकरण करण्यात आले. नामफलकाचे अनावरण माजी नगरसेवक फारूक पटवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्ही. आर. थोरवडे, सारिका लादे, रेश्मा लादे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संजय कांबळे, विकास लोंढे, संतोष वायदंडे आणि दत्तात्रय पवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास किशोर आठवले, किशोर थोरवडे, दत्तात्रय दुपटे, साबिरमिया मुल्ला, अनिलबापू घराळ, भारद्वाज वास्के, शेखर बर्गे, अशोक पाटील, बबन थोरवडे, अक्षय देसाई यांच्यासह नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment