कराड - माझी वाढती लोकप्रियता सहन होत नसल्याने विरोधकांना हाताशी धरून अपूर्ण माहितीच्या आधारे "दक्ष कराडकर' या सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून माझ्यावर खोटेनाटे आरोपांची राळ उठवण्यात येत आहे. त्यामुळे माझ्या सामाजिक जीवनातील प्रतिमेला तडा जात आहे,आणि मला नाहक त्रासही होत आहे त्यामुळे या ग्रुपवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी शहराच्या नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांनी आज येथील शहर पोलीस प्रमुख बी आर पाटील यांच्याकडे रीतसर लेखी तक्रार देऊन केली.
यावेळी उमेश शिंदे, मुकुंद चरेगावकर, एकनाथ बागडी उपस्थित होते.
तक्रारीत म्हटले आहे की, गेली ४ वर्षे कराड नगरपरिषदेची लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून मी कार्यरत आहे. सामाजिक जीवनात वावरत असताना पदाची प्रतिष्ठा जपत आहे.परंतु गेल्या काही महिन्यांपासून कराड शहरातील "दक्ष कराडकर" सोशल मिडिया ग्रुपमधून नाव न घेता तसेच कोणतीही शहानिशा न करता जाणून बुजून माझी बदनामी करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. यामध्ये व्हाट्स अप व फेसबुक पेज सामील आहेत.
नगराध्यक्षा म्हणून शासनाने दिलेल्या अधिकार व शासकीय अधीनियमानुसारच सर्व बाबी तपासूनच कामकाजाची पुढील कार्यवाही होत असते. माझी वाढती लोकप्रियता सहन होत नसल्याने विरोधकांना हाताशी धरून माझ्यावर खोटेनाटे आरोप होत आहेत. यामुळे मला नाहक त्रास होत आहे. माझ्यावर होणाऱ्या आरोपांची शहानिशा करून "दक्ष कराडकर" ग्रुपवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आणि माझी होणारी नाहक बदनामी थांबवण्यात यावी. असेही नगराध्यक्षांनी "दक्ष कराडकर' विरोधात पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
No comments:
Post a Comment