वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरातील रखडलेल्या विकासकामांच्या मुद्द्यावर आता राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. मंजूर करून आणल्यानंतरही अनेक कामे प्रत्यक्षात सुरू न झाल्याने आमदार डॉ. अतुल भोसले यांनी पुन्हा एकदा पालिका प्रशासनावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.पत्रकारांशी बोलताना आमदार भोसले म्हणाले, "राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कराड नगरपरिषदेकडे विशेष लक्ष आहे. शहराची प्रगती व्हावी यासाठी त्यांचे आणि माझे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. गावासाठी जो निधी आला आहे, तो गावासाठीच खर्च झाला पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. यापूर्वी मंजूर झालेला निधी वर्क ऑर्डर निघालेल्या विकासकामांवर का खर्च झाला नाही, कोणत्या अडचणी आहेत, याबाबत मी मुख्याधिकाऱ्यांना पत्राद्वारे विचारणा केली होती. मात्र अद्याप त्यांचे उत्तर आलेले नाही. आता मी त्यांना पुन्हा फोन करून विचारणा करणार आहे. काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी आम्ही सहकार्य करू; पण विकासकामे थांबता कामा नयेत."असे अतुलबाबा म्हणाले आहेत
कराडच्या सर्किट हाऊस येथे ते पत्रकारांशी बोलत होते
दरम्यान गुंड्याभाऊ वाटेगावकर यांनी पालिकेत भाजपच्या नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते की याच विषयाच्या पार्श्वभूमीवर आमदार अतुलबाबा पालिकेत लक्ष घालणार आहेत... आणि काल पत्रकारांशी बोलताना अतुलबाबांनी कराडच्या मुख्याधिकारी व्हटकर याना पहिल्यांदा पत्रव्यवहार करून याविषयी जाब विचारला असता अजूनही त्याचे उत्तर आले नाही, त्यामुळे आता पुन्हा व्हटकर त्यांना फोन करून जाब विचारणार असल्याचे म्हटले आहे त्यामुळे गटनेते वाटेगावकर म्हटल्याप्रमाणे अतुलबाबांनी यानिमित्ताने पालिकेत आता लक्ष घातले आहे असे स्पष्ट झाले आहे
आधी नगरसेवक, आता आमदारही आक्रमक
दरम्यान अतुलबाबांच्या या वक्तव्यामागे गेल्या काही दिवसांतील घडामोडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्या दालनात जाऊन शहरातील मंजूर विकासकामे अद्याप सुरू का झाली नाहीत, याचा जाब विचारला होता. रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, आणि इतर नागरी सुविधांशी संबंधित प्रश्नांवर प्रशासनाची भूमिका समाधानकारक नसल्याचा आरोप करत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर आमदार भोसले यांनीही स्वतंत्रपणे मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून याबाबतची कारणे विचारली होती. मात्र त्या पत्राला अद्याप उत्तर मिळाले नसल्याने आता त्यांनी थेट दूरध्वनीद्वारेही प्रशासनाकडे खुलासा मागण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.
प्रशासन काय उत्तर देणार?
मुख्याधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्राचे उत्तर अद्याप न मिळाल्याची आमदारांची सार्वजनिक नाराजी आणि आता पुन्हा थेट विचारणा करण्याची घोषणा यामुळे कराड पालिका प्रशासनावर दबाव वाढला आहे. मंजूर असूनही कामे न होण्यामागे अडथळे नेमके कोणते आहेत, कामे का रखडली आहेत... आणि ती कधी सुरू होणार, याबाबत प्रशासनाला आता स्पष्ट भूमिका मांडावी लागणार असल्याचे दिसत आहे.
याचनिमित्ताने कराडच्या विकासाच्या प्रश्नावर राजकीय नेतृत्व आणि पालिका प्रशासन यांच्यातील ही रस्सीखेच पुढील काही दिवसांत कोणते वळण घेते, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment