Friday, January 9, 2026

अजितदादा आणि शरद पवार हे एकच आहेत ; या दोघांनी भाजपला उल्लू बनवले... प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ ;

वेध माझा ऑनलाइन।
प्रकाश आंबेडकरांनी अजित पवार आणि शरद पवार एकत्र असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. दोन्ही पवारांनी भाजपला 'उल्लू' बनवले असून, सत्तेसाठी ते तत्त्वे बाजूला ठेवून वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. स्थानिक निवडणुकीत पवार गट एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आंबेडकरांनी राजकारणातील तत्त्वहीन युतींवरही तीव्र टीका केली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले आहेत. अजितदादा सत्ताधारी आघाडीत आहेत. तसेच दोन्ही पवार गटामध्ये पक्ष आणि निवडणूक चिन्हावरून कोर्टात वाद सुरू आहे. असं असताना दोन्ही पवार निवडणुकीत एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.  प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही पवार एकत्रच असून ते फक्त भाजपला उल्लू बनवत आहेत, असा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत हा दावा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर येथील जाहीर सभेतून अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. मी मागच्यावेळीही म्हटलं होतं की अभद्र युत्या तुम्हाला पाहायला मिळतील. अकोटमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झाली आहे. सत्तेसाठी भाजपनं तत्त्व सोडलं आहे. तर एमआयएमने आरएसएस विरोध सोडला आहे. त्याच बरोबर काँग्रेसचीही अंबनरनाथमध्ये भाजपसोबत युती झाली आहे. पक्ष, विचार आता महत्वाचा नाही. सत्तेततून मिळणारे टेंडर हेच महत्वाचे राहिलेत असं वाटतंय, असा हल्ला प्रकाश आंबेडकर यांनी चढवला.


No comments:

Post a Comment