वेध माझा ऑनलाईन।
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल खळबळजनक दावा केला आहे. "मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे काँग्रेस पक्षात येण्यास इच्छुक होते. त्यांच्या पक्षप्रवेशाला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मान्यता दिली होती. पण तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी नकार दिला होता. गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेस पक्षप्रवेशासाठी केंद्रात मंत्रिपदाची अट ठेवली होती. तसेच काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आपल्याला खासदारकीचा राजीनामा द्यावा लागले. तसेच केंद्रात मंत्रिपद दिले नाही तर नागपूरचे दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत, असं गोपीनाथ मुंडे म्हणाले होते", असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये पत्रकार परिषदेत केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. या वक्तव्यावर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या विषयावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या...
" आता त्यांच्याविषयी आम्ही वक्तव्य करणं उचित नाही. कारण त्यावेळी राजकारणात आम्ही नव्हतो. याशिवाय त्याचं आता औचित्यही नाही. पृथ्वीराज चव्हाण काही म्हणाले असतील. माझी त्यावेळी उपस्थिती नसेल. मी त्यावर प्रतिक्रिया देत नाही. याशिवाय उपस्थित असले तरी त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यावर सगळ्यांसमोर बोलणं उचित नाही. त्या काळाबद्दल टिप्पणी मला करता येणार नाही. कारण त्यावेळी मी नव्हते. ज्या संघटनेला गोपीनाथ मुंडे यांनी एवढं मोठं वटवृक्ष बनवलं, त्यांनी संघटनेला भरभरून दिलं, त्यानंतर मला असं वाटत नाही की, अशा पद्धतीने त्यांच्या विषयी विचार करण्याची आवश्यकता आहे."
"राजकारणात आजच्या परिस्थितीत अजूनही त्यांचं नाव लोकं घेतात. मग ते कोणत्याही अर्थाने घेत असतील. मी नाही म्हणत की, पृथ्वीराज बाबांनी गोपीनाथ मुंडे यांचं काम अनादराने घेतलं आहे. आदरानेच घेतलं असेल. आता माझ्याविषयीदेखील परवा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टिप्पणी केली. ते देखील अनादर करत नाहीत. मीडिया काय करतो, कुठल्यातरी एका कार्यक्रमाचं स्टेटमेंट काढतो आणि पंकजा मुंडे नाराज आहे, असा प्रश्न विचारतो."असे म्हणत पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रीया थांबवली
'
No comments:
Post a Comment