Sunday, August 16, 2026

कराडची कन्या... सई थिटे भेदक गोलंदाजीमुळे युएई संघ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र

वेध माझा ऑनलाईन।
मूळची कराडची आणि सध्या दुबईत वास्तव्य करणाऱ्या अवघ्या १५ वर्षांच्या सई थिटे हिने युएईच्या १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघातील निवडीचे सोने केले. तिच्या भेदक गोलंदाजीमुळे युएईचा संघ आयसीसी १९ वर्षांखालील महिला टी- २० विश्वचषक आशिया कप स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.  संघातील सर्वात युवा खेळाडू म्हणून ती संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
 
मलेशियातील स्पर्धेत सईने उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामन्यांमध्ये मोलाची कामगिरी बजावत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विश्वचषक पात्रता फेरीत सईने अत्यंत निर्णायक क्षणी उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद मिळवून दिले!  "युएई संघाला विश्वचषकासाठी पात्र ठरण्यासाठी शेवटच्या षटकात ६ धावांचा बचाव करायचा होता आणि ही महत्त्वपूर्ण शेवटची ओव्हर सईने टाकली; मलेशियाला विजयासाठी केवळ ६ धावांची गरज असताना, तिने पहिल्याच चेंडूवर बळी मिळवला. शेवटच्या दोन चेंडूंवर तीन धावांची गरज असताना, तिने केवळ एक धाव दिली आणि युएईच्या संघाने आयसीसी १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषक आशिया कप २०२७' मधील आपले स्थान पक्के केले. संपूर्ण सामन्यातील तिची गोलंदाजी अतिशय किफायती ठरली; तिने ४ षटकांत १ बळी घेत २५ धावा दिल्या.
दहावीच्या परीक्षांच्या काळातही सईने अभ्यासासोबत विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभाग घेत उत्कृष्ट समतोल साधला. पाचवीत असतानाच युएईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने दुबईमध्ये राहून गेली पाच वर्षे सातत्याने कठोर सराव, अथक मेहनत करून  स्वप्न प्रत्यक्षात साकार केले आहे. या यशामागे आई प्राजक्ता व वडील निखिल थिटे यांचे क्रिकेटवरील अपार प्रेम, मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहन यांचा सिंहाचा वाटा आहे. कराडचे विशाल थिटे यांची ती पुतणी असून  पूजा साहित्यचे नारायण कुलकर्णी यांची ती नात आहे.

सामन्याचा सारांश
२९ जुलै, २०२६ स्थळ: क्वालालंपूर, मलेशिया
नाणेफेक: युएई संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. युएई धावसंख्या: १९.३ षटकांत सर्वबाद ९५ (अल मसीरा जहांगीर ३१)
मलेशियाची धावसंख्या: २० षटकांत ९४/६
निकाल: युएई  संघ एक धावेने विजयी

No comments:

Post a Comment